रत्नागिरी:- शहरातील भगवती किल्ल्याजवळील पाण भुयार स्पॉट जवळ अज्ञात तरुणी खवळलेल्या समुद्रात पडून बेपत्ता झाली. ही तरुणी सेल्फि काढण्याच्या नादात पाय घसरुन पाण्यात पडली कि तिने समुद्रात उडी घेत आत्महत्या केली याबाबत माहिती मिळू शकली नसून ही घटना रविवार 29 जून रोजी दुपारी 12.30 वा.सुमारास घडली. दरम्यान सायंकाळी उशिरापर्यंत रत्नदुर्ग माउंटेनियर्स आणि चिपळूणहून आलेल्या एनडीआरफचे पथक फिशरीजच्या दोन ड्रोन कॅमेर्यांच्या सहाय्याने बेपत्ता तरुणीचा शोध घेत होते.
रविवारी सूट्टी असल्याने भगवती किल्ल्याजवळ असलेली शिवसूष्टी पाहण्यासाठी स्थानिक तसेच बाहेरुन पर्यटक येत असतात. रविवारी दुपारीही या ठिकाणी अशीच पर्यटकांनी गर्दी केली होती. त्यावेळी एक 23 ते 25 वर्षीय तरुणी पाण-भुयार स्पॉटजवळ असलेल्या रेलिंगच्या पुढे जाउन सेल्फी काढण्यात गुंग होती. दरम्यान, सेल्फी काढता-काढता तिने आपले चप्पल आणि स्कार्फ बाजुलाच काढून ठेवले होते. यावेळी त्या तरुणीच्या आजुबाजुला अन्य काही पर्यटकही निसर्गाचा आनंद लुटत असताना काही क्षणात ती तरुणी अचानकपणे सुमारे 200 ते 250 फूट खोल समुद्राच्या पाण्यात पडलेली दिसून आली. आजुबाजुच्या पर्यटकांनी आरडा-ओरडा करताच त्या ठिकाणी एकच गर्दी झाली. काहींनी शहर पोलिसांना याची माहिती देताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती.परंतू तत्पूर्वी ती तरुणी खवळलेल्या समुद्रात दिसेनाशी झाली होती. दरम्यान,रत्नदुर्ग माँटेनियर्स आणि एनडीआरएफच्या पथकाने घटनास्थळी धाव घेत तरुणीचा शोध घेण्याचा प्रयत्न्ा केला परंतू सोसाट्याचा वारा आणि खळवलेला समुद्रामुळे त्या तरुणीचा शोध घेण्यात अडथळे निर्माण होत होते.