ॲड. सचिन पारकर आणि ॲड. सागर तडवी यांची यशस्वी बाजू
रत्नागिरी:- रत्नागिरी येथील भगवती मंदिरानजीकच्या पाण-भुयार स्पॉटजवळ समुद्रात बेपत्ता झालेल्या सुखप्रीत धाडिवाल (मूळ रा. एलनाबाद, जि. सिरसा, हरयाणा) हिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल असलेल्या तिच्या मित्राला, जस्मिक केहर सिंग याला रत्नागिरी न्यायालयाने अखेर अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. जस्मिकच्या वतीने जेष्ठ वकील ॲड. सचिन पारकर आणि ॲड. सागर तडवी यांनी न्यायालयात प्रभावीपणे बाजू मांडत त्याला दिलासा मिळवून दिला.
२९ वर्षीय जस्मिक केहर सिंग (सध्या रा. सिद्धिविनायक नगर, शिवाजीनगर, रत्नागिरी मूळ रा. भाटिया कॉलनी फतेहाबाद, हरयाणा) याच्या विरोधात सुखप्रीतचे वडील प्रकाशसिंग धाडिवाल (६९, रा. एलनाबाद, जि. सिरसा, हरयाणा) यांनी रत्नागिरी शहर पोलिस स्थानकात गुरुवारी, ३ जुलै रोजी तक्रार दाखल केली होती. त्यांच्या तक्रारीनुसार, सुखप्रीत जस्मिकला भेटण्यासाठी २९ जून रोजी रत्नागिरीत आली होती. मात्र, जस्मिकने तिला भेटण्यास नकार दिल्याने, सुखप्रीतने टोकाचे पाऊल उचलून समुद्रात उडी मारली असावी, असा आरोप तिच्या वडिलांनी केला होता.
सुखप्रीत बेपत्ता झाल्याची पहिली खबर तिच्या वडिलांनी पिंपळगाव (नाशिक) पोलिस स्थानकात दिली होती. त्यानंतर झालेल्या चौकशीदरम्यान सुखप्रीत रत्नागिरीला गेल्याचे समोर आले. रत्नागिरीत पोहोचल्यानंतर प्रकाशसिंग धाडिवाल यांनी घटनास्थळी सापडलेली एक चप्पल आणि ओढणी आपल्या मुलीचीच असल्याची खात्री केली. त्यांच्या याच तक्रारीच्या आधारे रत्नागिरी पोलिसांनी जस्मिक केहर सिंग विरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा (कलम ३०६) दाखल केला होता.
गुन्हा दाखल झाल्यानंतर जस्मिकने तात्काळ अटकपूर्व जामिनासाठी रत्नागिरी न्यायालयात अर्ज केला होता. त्याच्यावर दाखल झालेले आरोप गंभीर स्वरूपाचे असल्याने जामीन मिळणे हे आव्हानात्मक होते. मात्र, ॲड. सचिन पारकर आणि ॲड. सागर तडवी यांनी न्यायालयासमोर जस्मिकच्या वतीने ठोस युक्तिवाद केला. त्यांनी घटनेची पार्श्वभूमी, उपलब्ध असलेले पुरावे आणि कायद्यातील तरतुदी विचारात घेऊन जस्मिकची बाजू मांडली.
दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर, न्यायालयाने जस्मिक केहर सिंगला अटकपूर्व जामीन मंजूर करण्याचा निर्णय दिला. या निर्णयामुळे जस्मिकला तात्पुरता दिलासा मिळाला असला तरी, या प्रकरणाचा तपास पुढे सुरू राहणार आहे. या प्रकरणाच्या पुढील घडामोडींकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.