भक्ष्याचा पाठलाग करताना बिबट्याने केले गाडीचे नुकसान

संगमेश्वर:- बाजारपेठेत उभ्या असलेल्या गाडीखालील कुत्र्याला भक्ष्य बनविण्यासाठी बिबट्याने केलेल्या धडपडीमुळे चारचाकीचे नुकसान झाले. काचेवर ओरखडेही पडले आहेत. हा प्रकार रविवारी रात्री घडला. त्यामुळे बाजारपेठेतील नागरिकांमध्ये भितीचे वातावरण आहे.

संगमेश्वरात काही दिवस बिबट्याने धुमाकूळ घातला आहे. छत्रपती संभाजीनगर येथे दादू कुष्टे यांच्या कुत्र्यावर बिबट्याने झडप घातल्याचा प्रकार चार दिवसांपुर्वी घडला होता. आरडाओरडा झाल्यामुळे साखळी बांधलेला कुत्रा पळवणे त्याला शक्य झाले नाही. मात्र झटापटीत कुत्रा जखमी झाला. त्याच्यावर उपचारही करण्यात आले. त्यानंतर बिबट्याने भर वस्तीतून कुत्रीची दोन पिल्ले उचलून नेली.

रविवारी रात्री गणेश रेडीज यांनी संगमेश्वर बाजारपेठेत गाडी उभी केली होती. रात्रीच्यावेळी कुत्रा गाडीच्या खाली झोपला होता. या वेळी परिसरात फिरणाऱ्या बिबट्याची नजर त्या कुत्र्यावर पडली. गाडीच्या खाली कुत्रा झोपल्याचे बिबट्याने पाहिल्यानंतर त्याची शिकार करण्यासाठी झडप घातली. मात्र त्याला गाडीखालील कुत्र्याची शिकार करणे अवघड झाले होते. कुत्रा भीतीने गाडीखाली अंग चोरून बसला होता. भक्ष्याच्यामध्ये गाडी आडवी येत असल्याने बिबट्याने गाडीच्या मेटलची नंबरप्लेटच तोडून टाकली. त्याचबरोबर इंजिनखालील फायबरही तोडले. यामध्ये गाडीचे नुकसान झाले आहे. या गोंधळात संधी साधून कुत्र्याने तेथून पोबारा केला. त्यानंतर बिबट्याने तिथून पळ काढला. संगमेश्वरातील या बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.


संगमेश्वर येथे बिबट्याचा आढळ असल्याची माहिती मिळाल्यानंतर त्याचा ठावठिकाणा निश्चित करण्यासाठी कॅमेरे लावलेले आहेत. बिबट्या कोणत्या मार्गाने येतो, हे निश्चित झाल्यानंतर पुढील कार्यवाही केली जाईल.- प्रकाश सुतार, प्रादेशिक वनअधिकारी