खेड:- मुंबई-गोवा महामार्गावरील बोरघर येथे ७ डिसेंबर रोजी पहाटे साडेपाचच्या सुमारास मोटारसायकलचा अपघात होऊन दोघेजण किरकोळ जखमी झाले. मुंबई, भांडूप येथून गुहागरकडे जात असलेली ही मोटारसायकल (एमएच १४ एफबी २३५०) अचानक नियंत्रण सुटल्याने ही दुर्घटना घडली.
अपघातानंतर घटनास्थळी भरणेनाका ब्रिजखाली असणाऱ्या श्री जगद्गुरू नरेंद्राचार्य जी संस्थान, नानिजधाम यांच्या रुग्णवाहिका सेवेकडून तत्काळ मदत मिळाली. रुग्णवाहिकेच्या पथकाने जखमींना त्वरित उपजिल्हा रुग्णालय, कळंबणी येथे प्राथमिक उपचारासाठी हलवले.
जखमींमध्ये विशाल रामचंद्र गुरव (वय ३०, रा. मालवण), प्रवेश सदानंद बाईत (३०, रा. गुहागर रामपूर) यांचा समावेश आहे. या अपघाताची नोंद स्थानिक पोलिस ठाण्यात करण्यात आली असून, पुढील तपास सुरू आहे. महामार्गावर अजून अनेक ठिकाणी कामे सुरू आहेत. रात्रीच्या वेळी त्याचा अंदाज येत नसल्यामुळे असे अपघात घडण्याच्या घटना घडत असतात.









