बोगस वाहन नोंदणीत आमदारांसह त्यांच्या नातेवाईकांचाही समावेश 

रत्नागिरी:- वाहनांच्या बोगस नोंदणीचे प्रकरण जुने असले तरी आरटीओ कार्यालाने २२ जणांना नव्याने दिलेल्या नोटीसांमुळे या प्रकरणाला नव्याने उकळी मिळाली आहे. या वाहनांमध्ये आमदार, त्यांच्या नातेवाईकांच्या गाड्याही आहेत. काही जिल्ह्यामध्ये आयुक्तांच्या विशेष आदेशानंतर टॅक्स भरून ही वाहने नियमीत करण्यात आली आहेत. रत्नागिरी जिल्ह्यातीलह टॅक्स भरलेल्या १०९ वाहनधारकांना ही अपेक्षा असून आयुक्तांनी ती नियमित करावी, अशी मागणी आहे.

येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातील या प्रकरणाने बोगस वाहन नोंदणीचे प्रकरण चांगलेच चर्चेला आहे. जुने प्रकरण असल्याने कर्तव्यावर असलेल्या आताच्या अधिकाऱ्यांचा त्याच्याशी काही संबंध नाही. मात्र एक बाजू पुढे आल्याने एजन्टांना दोषी धरले जात असले तरी संपुर्ण ऑनलाईन सिस्टीमचे नियंत्रण कर्मचाऱ्यांच्याच हाती आहेत. त्यामुळे कार्यालयातील कर्मचाऱ्याशी संधान असल्याशिवाय एवढा मोठा घोळ होणार नाही. यामध्ये फक्त एजन्टच बदनाम होत आहेत, असा सुर बहुतांशी एजन्टचा आज होता. ऑनलाइन नोंदणीत पळवाट शोधत चेसिस नंबरमध्ये जादा डॉट टाकून वाहनांच्या बोगस नोंदणी करण्यात आल्या. यामध्ये जिल्ह्यातील १३६ वाहनांचा समावेश होता. यापैकी १०९ जणांनी टॅक्स भरला असून, २२ जणांना टॅक्स भरण्याची अंतिम नोटीस बजवाण्यात आली आहे. सात दिवसात त्यांनी टॅक्स भरला नाही, तर वाहन नोंदणी रद्द होण्याची भिती आहे. बोगस नोंदणीमुळे १७ लाख ४९ हजाराचा टॅक्स आणि पसंती क्रमांकाचे ८ लाख ७९ हजार एवढा शासनाचा महसूल या घोळामुळे बुडाला आहे.

बोगस नोंदणी झालेल्या वाहनांमध्ये अनेक कंपन्यांची नवीन चार चाकी वाहनांचा समावेश आहे. सिंधुदुर्गमधील आमदाराचा आणि रत्नागिरी जिल्ह्यातील आमदारांच्या नातेवाईकांच्याही गाडीचा यामध्ये समावेश आहे. परिवहन आयुक्तांकडे मागणी करून त्यापैकी काही वाहनांची टॅक्स भरून घेऊन नियमित नोंदणी करण्यात आली आहे. रत्नागिरीतीलही १०९ वाहनधारकांनी आयुक्तांनी विशेष बाब म्हणून परवानगी द्यावी, अशी अपेक्षा आहे.