बोगस वारस तपास सातबारे तयार करणाऱ्या तलाठी, मंडळ अधिकाऱ्यावर गुन्हा

रत्नागिरी:- बोगस वारस तपास करुन संगनमताने सातबारे तयार करुन वृध्दाची फसवणूक केल्याप्रकरणी तलाठी आणि मंडळ अधिकार्‍यासह अन्य दोघांवर राजापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फसवणूकीची ही घटना 26 फेब्रुवारी 2020 रोजी घडली असून याबाबत सोमवार 4 जानेवारी 2021 रोजी तक्रार देण्यात आली आहे.

गावसजा तलाठी श्रध्दा भिमराव जोगदंड (रा.कोदवली,राजापूर), मंडळ अधिकारी कमलाकर यशवंत जाधव (रा.रत्नागिरी), दिशा धर्मपाल पवार (रा.गोळवशी लांजा) आणि पल्लवी संजय जाधव(रा.दादर,मुंबई) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. त्यांच्याविरोधात शंकर बाबू जाधव (70,रा.चिखले बौध्दवाडी राजापूर,रत्नागिरी) यांनी तक्रार दिली आहे.त्यानुसार, संशयित चार जणांनी संगनमताने शंकर जाधव यांच्या नावाच्या दोन व्यक्तीचे खाते नंबर व सातबारे नंबर हे वेगवेगळे असल्याचे माहिती असूनही बोगस वारस तपास करुन शंकर जाधव यांच्या नावाचे सातबारे दिशा पवार आणि पल्लवी जाधव या दोघींच्या नावे करुन त्यांची फसवणूक केली. याप्रकरणी अधिक तपास पोलिस निरीक्षक परब करत आहेत.