बेपत्ता नौकेवरील एका खलाशाचा मृतदेह हाती

रत्नागिरी:- तालुक्यातील जयगड येथून पाच दिवसांपुर्वी मच्छीमारीसाठी गेलेली बोट अद्यापही परतली नाही. त्या बोटीवरील सहा खलाशांपैकी एकाचा मृतदेह गुहागर किनार्‍यापासून २० नॉटीकल खोल समुद्रात आढळून आल्याचे जयगड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक जे. एच. कळेकर यांनी दिली. खलाशाचा मृतदेह सापडल्यामुळे ती बोट समुद्रात बुडाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. बेपत्ता बोटीचा शोध घेण्यासाठी शासकीय यंत्रणा कामाला लागली आहे.

अनिल आंबेरकर ( वय ५०, रा. साखरी आगर-गुहागर) असे मृत खलाशाचे नाव आहे. पाच दिवसांपूर्वी बेपत्ता झालेल्या त्या बोटीचा कसून शोध जयगड पोलिस यंत्रणा करत आहे. या बोटीवर बेपत्ता खलाशांमध्ये दत्तात्रय झगडे, दगडू तांडेल, अनिल आंबेरकर, गोकुळ नाटेकर, अमोल जाधव, सुरेश कांबळे आदींचा समावेश आहे. नासिर हुसेनमियॅा संसारे यांच्या मालकीची ‘नावेद ‘ ही मच्छीमारी बोट २६ ऑक्टोबरला जयगड बंदरातून मासेमारीसाठी रवाना झाली होती. ही बोट २८ ऑगस्टला जयगड बंदरात येणे अपेक्षीत होते; मात्र ३० तारखेपर्यंत ही बोट जयगड बंदरात परत आली नाही. त्या बोटीशी संपर्क साधण्याचाही प्रयत्न करण्यात आला होता. तक्रार दाखल झाल्यानंतर बोटीचा शोध घेण्यासाठी प्रयत्न सुरु झाले. तटरक्षक दलालाही याची माहिती देण्यात आली आहे. शनिवारी (ता. ३०) दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास काही मच्छीमारांना काहीतरी तरंगताना दिसले. लागलीच कोस्टगार्डने २० वावात जाऊन पाहणी केली. कस्टमचेही युद्धपातळीवर काम सुरु आहे. यामध्ये एक मृतदेह हाती लागला आहे. अनिल आंबेरकर असे या खलाश्याचे नाव आहे. समुद्रात २० नॉटीकल परिसरात आढळला असल्याने बोटीला जलसमाधी मिळाली असावी अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.

मंगळवारी झाला होता संपर्क

बेपत्ता झालेल्या यंत्रणेवर संपर्कासाठीची कोणतीही यंत्रणा नाही. नौकेवरील खलाशाने मंगळवारी फोनवरुन दाभोळजवळ कुठेतरी असल्याचे मालकाला कळवले होते. त्यानंतर त्यांचा काहीच संपर्क झालेला नव्हता.