बिल्डिंगवरून उडी मारत बांधकाम व्यवसायिकाची आत्महत्या

रत्नागिरी:- रत्नागिरीतील बांधकाम व्यावसायिक चंद्रकांत शांतीलाल पटेल यांनी गुरुवारी पहाटे बिल्डिंग वरून उडी घेत आत्महत्या केली. पहाटे साडेपाच वाजता मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडलेल्या महिलेला त्यांचा मृतदेह आढळून आला आणि एकच खळबळ उडाली.

शहरातील माळनाका येथील तारा ऑर्किड येथे चंद्रकांत पटेल वास्तव्याला होते. विशेष म्हणजे एक दिवस आधीच ते त्यांचे मुळगाव गुजरात राजकोट येथून रत्नागिरीला परतले होते. येताना ते सोबत त्यांच्या वडिलांना देखील घेऊन आले होते. 

दोन महिन्यांपूर्वी लॉकडॉऊन उठल्यानंतर ते आपल्या मूळ गावाला गेले होते. तिथे गेल्यानंतर त्यांना कोरोनाची लागण झाली होती. कोरोनावर त्यांनी यशस्वी मात देखील केली. दोन महिने ते घरीच होते. एक दिवसापूर्वी ते आपल्या वडीलांसह रत्नगिरीत परतले होते. गुरुवारी पहाटेच्या सुमारास त्यांनी आपल्या फ्लॅटला बाहेरून कडी लावली आणि इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून उडी घेत आत्महत्या केली. सकाळी साडेपाच वाजता मॉर्निंग वॉक साठी बाहेर पडलेल्या महिलेला त्यांचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडलेला दिसून आला आणि एकच खळबळ उडाली. 

पटेल यांच्या आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. त्यांची आर्थिक परिस्थिती देखील चांगली होती. 2 ते 3 इमारती त्यांनी स्वतः उभ्या केल्या असून रत्नागिरीत त्यांचे स्वतःच्या मालकीचे 3 ते 4 फ्लॅट आहेत. असे असताना गावातून परतल्यानंतर अचानक त्यानी आत्महत्या का केली हा प्रश्न सर्वानाच पडला आहे.