तज्ज्ञांचे मत ; वेग आणि करंट असलेला पहिलाच प्रकार
रत्नागिरी:- बिपरजॉय चक्रीवादळ कोकण किनारपट्टीपासून सुमारे सातशे किलोमीटर खोल समुद्रात असतानाही वार्याच्या वेगामुळे तयार झालेल्या लाटा वेगाने गणपतीपुळेसह अन्य किनार्यांवर जाणवल्या, असे तज्ज्ञांकडून सांगण्यात आले. तर रविवारच्या (ता. 11) त्या लाटेला वेग आणि करंट होता. किनार्यावरील कठडयापर्यंत लाटा येतात, पण वेगाने अचानक लाट येण्याचा पहिलाच प्रकार आहे. तेरा वर्षापुर्वी आलेल्या उधाणावेळच्या लाटांमुळे शासकीय विश्रामगृहाच्या भिंतीचे नुकसान झाले होते.
समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यानंतर त्याचे रुपांतर चक्रीवादळात होते. या वादळाच्या भोवती
निर्माण होणारे वारे आणि त्याचा वेग यामधून लाटा तयार होतात. चक्री वादळामुळे निर्माण झालेल्या वा-यामुळे लाटा तयार होतात आणि त्या वेगाने किना-याकडे सरकतात. वा-याच्या वेगावर किना-यावरील लाटांचे स्वरुप अवलंबून असते. बीपरजॉय चक्रीवादळाचा परीणाम गेले काही दिवस कोकण किनारपट्टी भागात जाणवत आहे. रविवारी सायंकाळी ओहोटी सुरु होण्याच्यावेळी गणपतीपुळे किनारपट्टीवर आलेल्या दोन लाटांनी पर्यटकांसह किनार्यावरील व्यापार्यांमध्ये काही क्षणासाठी धडकी भरली. या लाटेची चर्चा सर्वदूर होऊ लागली आहे. याबाबत गणपतीपुळेतील डॉ. विवेक भिडे म्हणाले, येथील किनार्यावर पावसाळ्यात मोठ्या लाटा येत असतात. रविवारच्या लाटेला वेग प्रचंड होता. वादळामुळे लाटेची तिव्रता वाढत गेली आणि उंचीही होती. साधारणपणे 2008 च्या दरम्यान आलेल्या मोठ्या लाटेत किनार्यावरील शासकीय विश्रामगृहाच्या संरक्षक भिंतीचे नुकसान झाले होते.
दरम्यान, बिपरजॉय चक्रीवादळ गुजरात, पाकिस्तानकडे सरकत असल्याचा अंदाज आहे. या वादळाचा प्रभाव पुढील 36 तास कोकण किनारपट्टीवर जाणवेल अशी शक्यता वर्तविली जात आहे.