बाळ मानेंना जशास तसे उत्तर देणार

शिवसेना शहर प्रमुख बिपीन बंदरकर यांचे प्रत्युत्तर

रत्नागिरी:- शुक्रवारी सकाळी बाळ माने यांनी पालकमंत्री उदय सामंत यांच्यावर केलेल्या टीकेला सडेतोड प्रत्युत्तर देण्यासाठी आज सायंकाळी आयोजित पत्रकार परिषदेत बिपीन बंदरकर यांनी हा घणाघाती पलटवार केला. माने यांचा सर्व रोख केवळ चर्चेत राहण्यासाठी असून, यापुढे अशी टीका केल्यास ‘जशास तसे’ उत्तर दिले जाईल, शिवसेना शहर प्रमुख बिपीन बंदरकर यांनी सांगितले.

शुक्रवारी सकाळी शिवसेना (उबाठा) उपनेते बाळ माने यांनी पत्रकार परिषद घेत, “रत्नागिरीला माझ्यासारख्या ‘सिंघम’ची गरज आहे,” असे वक्तव्य करीत मंत्री उदय सामंत यांच्या कार्यपद्धतीवर जोरदार टीकास्त्र सोडले होते.

माने यांच्या या ‘सिंघम’ वक्तव्याची सायंकाळ होताच बिपीन बंदरकर यांनी पत्रकार परिषदेत खिल्ली उडवली. अत्यंत आक्रमक आणि आवेशात बोलताना बंदरकर म्हणाले, “बाळ माने स्वतःला सिंघम म्हणवून घेत आहेत, पण ते सिंघम नसून जनतेने चार वेळा नाकारलेले, थुकलेले चिंगम आहेत. केवळ पालकमंत्री उदय सामंत यांच्यावर टीका करण्याशिवाय त्यांना दुसरे कोणतेही काम उरलेले नाही.”

पालकमंत्री उदय सामंत यांची बाजू उचलून धरताना बंदरकर म्हणाले, “राज्याचे उद्योगमंत्री उदयजी सामंत हे फक्त रत्नागिरीपुरते मर्यादित नेते नाहीत, तर ते राज्यातील आघाडीच्या फळीतील नेते आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या स्तरावर आज त्यांचे नाव घेतले जाते. त्यांनी केवळ रत्नागिरीतच नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्रात आपल्या कार्याचा ठसा उमटवला आहे.”

“एवढ्या मोठ्या नेत्यावर टीका केली की आपले नाव चर्चेत राहते, हे बाळ माने यांनी ओळखले आहे,” असा टोला लगावताना बंदरकर म्हणाले, “उदय सामंतांवर टीका केली, तरच लोक आपल्याकडे लक्ष देतील आणि आपले राजकीय अस्तित्व टिकेल, यासाठीच त्यांचा हा केविलवाणा प्रयत्न सुरू आहे.”

यापुढे अशी टीका सहन केली जाणार नाही, असा इशारा देत बंदरकर म्हणाले, “बाळ माने यांनी यापुढे अशी बिनबुडाची टीका केल्यास, त्यांना जशास तसे उत्तर दिले जाईल.”

या पत्रकार परिषदेला शिवसेना जिल्हाप्रमुख राहुल पंडित, तालुकाप्रमुख बंड्या साळवी, उपजिल्हाप्रमुख संजय साळवी, विधानसभा क्षेत्रप्रमुख सुदेश मयेकर, बाबू म्हाप यांच्यासह शिवसेनेचे प्रमुख पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या पलटवारामुळे रत्नागिरीतील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.