दोन मतदारसंघात खिंडार; राजापूर, चिपळूणवर परिणाम
रत्नागिरी:- एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीचा फटका रत्नागिरी जिल्ह्यातील शिवसेनेला बसला आहे. माजी मंत्री आमदार उदय सामंत, आमदार योगेश कदम यांच्या रत्नागिरी-संगमेश्वर आणि खेड- दापोली- मंडणगड या दोन मतदारसंघातील बर्याच नगरसेवक, पदाधिकार्यांनी शिंदे गटात सामील होणे पसंत केल्याने तेथील शिवसेनेला आता वर्चस्व टिकवून ठेवण्यासाठी झुंज द्यावी लागणार आहे. तर या सर्वांचा परिणाम आजूबाजूच्या मतदारसंघावर होणार असून बालेकिल्ल्यातच उध्दव ठाकरेंना शिवसेना टिकवण्याचे आव्हान निर्माण झाले आहे.
हिंदुत्वाच्या मुद्यावर एकनाथ शिंदेनी बंडाचा झेंडा फडकवल्यानंतर कदम, सामंतांनी गुवाहटीला जाणे पसंत केले. गेल्या काही दिवसात शिवसेनेकडून सभासद नोंदणीसह प्रतिज्ञापत्र घेण्यास सुरुवात केल्यामुळे शिंदे गटानेही नगरसेवक, पदाधिकारी यांना आपलेसे करण्यास आरंभ केला आहे. खेड-दापोली-मंडणगडचे आमदार योगेश कदम यांनी शक्तिप्रदर्शन करण्यास सुरुवात केली आहे. काही नगरसेवकांसह पदाधिकार्यांना घेऊन ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटले. पाठोपाठ रत्नागिरीचे आमदार सामंत यांनीही मतदारसंघात दौरा करत चाचपणी केली. पाली येथे त्यांचे स्वागतही जोरदार झाले. यावेळी पाली गणासह वाटद आणि खाडीपट्ट्यातील कार्यकर्त्यांनी हजेरी लावली. तर त्याच दिवशी सायंकाळी शहरातील सुमारे 19 नगरसेवकांसह शहरप्रमुख, उपजिल्हाप्रमुख आणि अन्य काही पदाधिकार्यांनी सामंत यांना पाठींबा दर्शवला आहे. तालुक्यातील काही नेतेही सामंतांच्या संपर्कात असून मंत्रीपदाच्या निवडीनंतर मोठा गट सामंतांकडे सक्रिय होईल अशी शक्यता वर्तविली जात आहे. त्यामुळे रत्नागिरी विधानसभा मतदारसंघात शिवसेनेकडून राबविण्यात येत असलेल्या सभासद नोंदणीचे आव्हानच आहे.
बंडखोरीनंतर दोन विधानसभा मतदारसंघातील शिवसेना खिळखिळी होण्याच्या मार्गावर आहे. दोन्ही नेत्यांच्या जाण्यामुळे भविष्यात सेनेच्या वाढीला खिळ बसण्याची भिती व्यक्त केली जात आहे. सामंतांच्या बंडाचा परिणाम लांजा-राजापूर मतदारसंघावरही होऊ शकतो. या दोन्ही तालुक्यात सामंतांनी काही अंशी वर्चस्व प्रस्थापित केले आहे. शिवसेनेचे नवनियुक्त उपनेते तथा आमदार राजन साळवींची राजापुरमध्ये चांगली ताकद आहे, पण लांज्यात त्यांना विरोध होत आहे. हाच मुद्दा भविष्यात शिवसेनेत गट पडण्याला कारणीभूत ठरु शकतो. चिपळूण मतदारसंघावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या शेखर निकम यांची चांगली पकड आहे. शिवसेनेतील या गोंधळामुळे तेथील सैनिकही थोडे बिथरलेलेच आहेत. शिवसेनेच्या माजी आमदार चव्हाण यांचे पुर्वीसारखे प्रस्थ राहीलेले नाही. गुहागरचे आमदार भास्कर जाधव जिल्हाप्रमुख सचिन कदम यांच्या साथीने चिपळूणात बस्तान मांडायचा प्रयत्न करत असले तरीही त्यांना शिवसैनिक किती आपलेसे करतील याबाबत साशंकताच आहे. संगमेश्वर तालुक्यात सामंत यांचा थोडासा शिरकाव आधीच झालेला असल्याने रत्नागिरीचे लोण तिकडेही पसरण्यास वेळ लागणार नाही. गुहागर वगळता अन्य चारही विधानसभा मतदारसंघात शिवसेनेला पुन्हा उभारी घेण्याचे आव्हानच आहे.