रत्नागिरी:- मेर्वी परिसरात बिबट्याने चौघांवर हल्ला केल्यानंतर वन विभागाने त्याला पकडण्यासाठी कॅमेरे आणि पिंजरे लावले आहेत. मात्र, बारा दिवसांच्या या विशेष प्रयत्नांना बिबट्याने हुलकावणी दिली असून वन विभागाच्या सापळ्यांकडे बिबट्या फिरकलाच नाही.
गेली दोन वर्षे मेर्वी परिसरातील बिबट्या माणसे व प्राण्यांवर हल्ले करत आहे. बिबट्याला पकडण्यासाठी वन विभागातर्फे अनेक प्रयत्न झाले. ते फोल ठरले. यापूर्वी कुर्धे येथे एका विहिरीत बिबट्याचे पिल्लू पडले होते. परंतु वन विभागाला त्याला वर काढण्यात यश आले नाही. अखेर त्याने विहिरीत लावलेल्या शिडीद्वारे रातोरात पळ काढला.
त्यानंतर मेर्वी येथे बिबट्याची पिल्ले एका घरात घुसली होती. वन विभागाने त्या पिल्लांना जंगलात सोडले होते. यावर्षी चौघांवर बिबट्याने हल्ला केल्यानंतर वन विभाग त्याला पकडण्यासाठी अतक प्रयत्न करत आहे. मात्र, तो आपला मार्ग बदलून अन्य भागातून फिरत असल्याचे दिसत आहे.
सध्या पावस, नाखरे आदी भागात बिबट्याचा संचार सुरू आहे. त्यामुळे वन विभाग अनेक ठिकाणी पिंजरे लावून त्यात त्याला पकडण्याकरिता प्रयत्नशील आहे. परंतु अद्यापही त्या पिंजऱ्यात असलेल्या भक्ष्याकडे दुर्लक्षित करून तो वन विभागाला हुलकावणी देत आहे. वन विभागातर्फे नागरिकांना ध्वनिक्षेपकावरून सूचना दिल्या जात आहेत. पंचक्रोशीत रस्त्याशेजारी फलक लावून जागृती होत आहे. परिसरात आत्तापर्यंत चार बिबट्यांचा अपघाती मृत्यू झाला आहे. मात्र, एकदाच फासकीत अडकलेल्या बिबट्याला जीवदान देण्यात यश आले आहे. वारंवार हल्ला करणाऱ्या बिबट्याला जेरबंद करण्यात यश आलेले नाही.