बारावीच्या पहिल्याच पेपरला ५० विद्यार्थी गैरहजर

चिपळूण:- राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात येणाऱ्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र अर्थात १२वी परीक्षेस मंगळवारपासून प्रारंभझाला. चिपळूण तालुक्यात एकूण ७केंद्रांवर ३,१३५ इतके विद्यार्थी परीक्षेस बसले असून त्यापैकी ५० विद्यार्थी पहिल्याच पेपरला गैरहजर होते.

बारावीचा पहिला पेपर इंग्रजी विषयाचा होता. परीक्षा वेळेपूर्वी काही तास अगोदर विद्यार्थ्यांसह काही पालक परीक्षा केंद्राबाहेर दाखल झाले होते. यावेळी बैठक व्यवस्था पाहण्यासाठी विद्यार्थ्यांनी मोठी लगबग सुरू होती. पहिलाचा पेपर इंग्रजीचा असल्याने अनेक विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर या पेपरची चिंता दिसून येत होती.

तालुक्यातील एकूण सात केंद्रांवर कला, वाणिज्य, विज्ञान अशा तीन शाखाच्या विद्यार्थ्यांची परीक्षा सुरू आहे. पहिल्या दिवशी डीबीजे महाविद्यालय केंद्रावर ७३५ पैकी ८, सती विद्यालयात ३९७ पैकी १९, सावर्डे विद्यालयात ७९३ हजर पैकी ९, महाराष्ट्र हायस्कूलमध्ये ४२० पैकी २, शिरगाव विद्यालयात १८१ हजर पैकी ४, तर रामपूर विद्यालयात १३६ पैकी ८ विद्यार्थी गैरहजर होते. तर गद्रे स्कूलमध्ये ४७३ पैकी एकही विद्यार्थी गैरहजर नव्हता.

परीक्षा कालावधीत कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी प्रत्येक केंद्रावर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. याशिवाय कॉपीमुक्त परीक्षा पार पडावी यासाठी भरारी पथक तसेच प्रत्येक केंद्रावरील कॉपीमुक्तसाठीचे पथक कार्यरत होते.