बारावीचा आज ऑनलाईन निकाल; कोकण बोर्डाच्या निकालाबाबत उत्सुकता कायम

रत्नागिरी:- इयत्ता बारावीच्या परीक्षेचा सोमवारी ५ मे रोजी ऑनलाइन निकाल जाहीर होणार आहे. कोकण बोर्डातील २४,१६८ विद्यार्थ्यांचा निकाल घोषित होईल. यंदाही सलगपणे कोकण बोर्ड राज्यात प्रथम येणार का याची उत्सुकता लागून राहिली आहे.

कोकण विभागात इयत्ता बारावीच्या परीक्षेसाठी रत्नागिरीत ३८ व सिंधुदुर्गमध्ये २३ अशी ६१ परीक्षा केंद्र होतील. तसेच २२ परीरक्षक कार्यरत होते. बारावी परीक्षेसाठी रत्नागिरी जिल्ह्यात ३ केंद्रांवर केंद्रसंचालक व इतर कर्मचारी बदल करण्यात आले होते. रत्नागिरी जिल्ह्यात १६३ कनिष्ठ महाविद्यालये व सिंधुदुर्ग जिल्ह्यात ८९ अशा २५२ कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती.

विद्यार्थी अधिकृत वेबसाईटवर जाऊन गुणपत्रिकेची प्रत डाऊनलोड करून निकाल पाहू शकतील. मंगळवार दि.६ मे पासून महाविद्यालयमध्ये विद्यार्थ्यांना गुणपत्रिका दिली जाणार आहे. निकाल पाहण्यासाठी विद्यार्थ्यांना आपला रोल नंबर आणि आईचे पहिले नाव आवश्यक असेल. निकालानंतर काही आठवड्यांत पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज करता येईल. तर जुलै-ऑगस्ट २०२५ मध्ये पुरवणी परीक्षा आयोजित केली जाईल, आणि त्याचा निकाल सप्टेंबर २०२५ मध्ये जाहीर होण्याची शक्यता आहे.

कोकण बोर्डाचा विचार करता रत्नागिरी जिल्ह्यातील १६ हजार ७९ आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ८ हजार ८९ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली आहे. या सर्व २४ हजार १६८ विद्यार्थ्यांचा निकाल उद्या दुपारी ऑनलाइन जाहीर करण्यात येणार आहे. कॉपीविरहित आणि कोणताही गैरप्रकार होऊ नये याकरिता प्रशिक्षण, सूचना या सर्व पातळीवर परीक्षा प्रक्रिया राबवण्यात आली आहे. कॉपीसारखे गैरप्रकार घडू नयेत यासाठी कोकण बोर्डाने ७ भरारी पथके तैनात ठेवली होती. त्याचबरोबर जिल्हाधिकारी कार्यालयाची भरारी पथकेही पाहणी करत होती. ड्रोन कॅमेऱ्याच्या माध्यमातून चिपळूणसारख्या संवेदनशील परिसरात जिल्हाधिकारी कार्यालयाची नजर होती. परीक्षा केंद्रावर पोलीस बंदोबस्तही ठेवण्यात आला होता. त्यामुळे उद्या निकालानंतर कोकणच राज्यात अव्वल असेल अशी आशा सर्व शिक्षणप्रेमींना आहे.