बाबासाहेबांच्या सान्निध्याने आयुष्याचे सोने झाले: अर्जुन कसबे

रत्नागिरी:- स्वातंत्र्यानंतर झालेल्या लोकसभा निवडणुकीत मुंबईतील नागपाडा मतदारसंघातून सन 1952ला भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी निवडणूक लढवली. त्यांच्या निवडणुकीत प्रचारात सहभाग होण्यासह बुथ प्रतिनिधी होण्याचा बहुमान मिळाला. बुथ प्रतिनिधीच्या बैठकीत उपस्थित असलेल्यांपैकी सर्वात लहान म्हणून आपली चौकशी करत बाबासाहेबांनी पाठिवर मारलेली थाप आजही आठवते. बाबासाहेबांच्या कौतुकाच्या थापेमुळे आयुष्याचे सोने झाल्याची भावना आरटीओतील सेवानिवृत्त जनसंपर्क अधिकारी अर्जुन कसबे यांनी पत्रकारांसमोर बोलताना व्यक्त केली. यावेळी त्यांना आपले अश्रू आवरता आले नाहीत.

सन 1952 मध्ये डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी नागपाडा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला. त्या काळात हा मतदारसंघ चाळी व झोपडपट्टीने व्यापलेला होता. अनेकजण मजुरी करीत असल्याने संपूर्ण मतदारसंघातील मतदार गरीबच होते. निवडणूक जाहीर झाल्यानंतर डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी बुथ प्रतिनिधींची बैठक बोलवली होती. बैठक दहा मिनिटात पार पडली. बैठकीतून बाहेर पडताना बाबासाहेबांचे लक्ष माझ्याकडे गेले आणि त्यांचा राग अनावर झाला. राजकीय पक्षाच्या बैठकीला शालेय विद्यार्थी आलाच कसा? त्याचे हे वय शिकण्याचे आहे. असे सांगत बाबासाहेबांनी प्रमुख नेत्यांना फैलावर धरले. यावेळी काही जाणकारांनी आपल्याबद्दल माहिती देताना ज्या प्रभागात आपण रहात होतो तेथे मी एकमेव शिक्षित असल्याने पक्षाच्या लिखापटीचे काम करत होतो. त्यामुळे बैठकीतील माहिती व्हावी यासाठी या मुलाला बोलावल्याचे नेत्यांनी सांगितल्यानंतर बाबासाहेबांचा राग शांत झाला. त्यांनी आपल्याला जवळ बोलवत पाठीवर कौतुकाची थाप मारली असे श्री.कसबे यांनी सांगितले.
बाबासाहेबांना भेटण्याचा योग चारवेळा आला. एकदा तर बाबासाहेब आपल्या घरी आले होते. यावेळी घरातील स्थिती पाहता जुन्या सवयी सोडून आयुष्यात प्रगती करण्याचा सल्ला त्यांनी दिला. परिसरात स्वच्छता राखा. कपडे फाटके असतील तरी चालतील परंतु ते स्वच्छ असले पाहिजे. फाटके कपडे शिवून घाला. परंतु मुलांना शाळेत पाठवा. त्यांना उच्चशिक्षित करा तरच समाजाची प्रगती होईल. आजची पिढी शिकली तरच उद्याचा नागरिक उच्चशिक्षित म्हणून भावी पिढी घडवेल असा संदेश त्यावेळी बाबासाहेबांनी दिला. त्यानंतर खऱ्या अर्थाने परिवर्तनाला सुरूवात झाली.

बाबासाहेबांचे महापरिनिर्वाण झाल्याचे वृत्त रेडिओवर आल्याचे गल्लीतील दुकानदाराने सांगितले तेव्हा या गोष्टीवर विश्वासच बसत नव्हता. त्यानंतर त्याची माहिती आपण स्वतः चाळीत दिली. तेथून थेट रेल्वे स्थानक गाठले. सांताक्रुझ विमानतळावर बाबासाहेबांचे पार्थिव येणार होते. परंतु नागपूरमधील अनुयायांनी बाबासाहेबांचे पार्थिव नागपूरमार्गे मुंबईला नेण्याची विनंती केल्याने आम्ही विमानतळावर पार्थिवाची प्रतिक्षा करत होतो. अखेर तो क्षण आला. विमान उतरताच आपण पायरीजवळच उभे राहिलो होतो. बाबासाहेबांचा तो अखेरचा स्पर्श आपल्याला घेता आला. बाबासाहेबांच्या सान्निध्यात येण्याचे भाग्य माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला मिळाले हेच आपल्या आयुष्यातील सोने असल्याची प्रतिक्रिया श्री.कसबे यांनी व्यक्त केली.