बाप्पांची स्वारी… भक्तांच्या घरी! आज घरोघरी प्राणप्रतिष्ठापना 

रत्नागिरी:- ‘बाप्पा मोरया’ चा जयघोष… ढोल ताशांच्या निनाद… फुलांनी सजवलेल्या माळा… आणि गणेशभक्तांचे उत्साहीत चेहरे अशा मंगलमय वातावरणात गणेशचतुर्र्थीपूर्वीच हरतालीका तृतीयेला गणेशभक्तांनी आपल्या लाडक्या बाप्पाला घरी घेऊन जाणे पसंत केले. गणेशचतुर्थीच्या दिवशी होणारी धावपळ टाळण्यासाठी आणि पावसाचे विघ्न टाळण्यासाठी अनेक गणेशभक्तांनी मंगळवारीच अगदी वाजत-गाजत बाप्पाची मूर्ती घरी आणली, बुधवारी गणेशचतुर्थीच्या दिवशी जिल्ह्यात १ लाख ६६ हजार ५८७ ठिकाणी खासगी आणि ११०  सार्वजनिक गणेशमूर्तींची प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे.

जिल्ह्यात गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर घरोघरी श्री गणेशाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे. मात्र गणेश चतुर्थीच्या एक दिवस आधीच गणेशभक्तांनी गणेशाची मूर्ती घरी नेणे पसंत केले. मागील काही दिवस सुरू असलेला पावसाचा जोर कमी झाला असला तरी पुढील काही दिवस पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. मंगळवारी अगदी पारंपारीक पध्दतीने ढोल-ताशांच्या गजरात आणि बाप्पा मोरयाच्या जयघोषात बाप्पा घरोघरी नेण्यात आले. गणेशाच्या पूजेकरीता आवश्यक साहीत्य खरेदीकरीतादेखील गणेशभक्तांनी बाजारपेठेत गर्दी केली होती. किरकोळ वर्दळ असणारी रत्नागिरी बाजारपेठ मात्र या दोन दिवसांपासून गणेशभक्तांच्या गर्दीने फुलुन गेली होती. बाप्पाच्या पूजेकरीता आवश्यक धूप, कापूर, उदबत्ती, फुले, तोरणमाळ, सजावटीचे सामान घेण्यासाठी गणेशभक्त बाजारपेठेत दाखल झाले होते. शहरातील राम आळी गणेशभक्तांनी फुलुन गेली होती. मागील दोन दिवस गणेशभक्तांनी लाडक्या बाप्पाच्या स्वागतासाठी आवश्यक साहित्य करण्यासाठी केलेल्या गर्दीमुळे रामआळी बंद ठेवण्यात आली होती. पाऊस असतानाही लाडक्या बाप्पाच्या स्वागतासाठी रत्नागिरीकरांनी बाजारपेठेत गर्दी केली होती. 

जिल्ह्यात १ लाख ६६ हजार ५८७ ठिकाणी खासगी आणि ११०  सार्वजनिक बाप्पांच्या मूर्तीची सोमवारी प्रतिष्ठापना होणार आहे. रत्नाागिरी शहरामध्ये ७,९११ घरगुती तर २६ सार्वजनिक गणेशोत्सवांची प्राणप्रतिष्ठापना केली जाणार आहे. रत्नागिरीच्या ग्रामीण भागात ९ हजार ४३९ घरगुती व केवळ एक सार्वजनिक, जयगड परिसरात २८०१ घरगुती तर ६ सार्वजनिक, संगमेश्वर १३,५६४ घरगुती तर १ सार्वजनिक, राजापूर १९,९०० घरगुती तर ६ सार्वजनिक, नाटे ७,३६५ घरगुती तर २ सार्वजनिक, लांजा १३,५४० घरगुती तर ६ सार्वजनिक, देवरूख १२,४९३ घरगुती तर ७ सार्वजनिक, सावर्डे १०,२४० घरगुती तर २ सार्वजनिक, चिपळूण १६,४६४ घरगुती तर १३ सार्वजनिक, गुहागर १४,४६० घरगुती तर २ सार्वजनिक, अलोरे ५ हजार ६५० घरगुती तर ३ सार्वजनिक, खेड १३,७२५ घरगुती तर १७ सार्वजनिक, दापोली ६३३६ घरगुती तर ९ सार्वजनिक, मंडणगड ४,३८९ घरगुती तर ६ सार्वजनिक, बाणकोटमध्ये ७६० घरगुती तर २ सार्वजनिक, पूर्णगडमध्ये ५,६७५ खासगी आणि दाभोळमध्ये १ हजार ८७५ खासगी तर एका ठिकाणी सार्वजनिक गणेशोत्सवाची प्रतिष्ठापना होणार आहे.