रत्नागिरी:- रत्नागिरी जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक मंडळाच्या निवडणुकीत व्यापारी व आडते प्रतिनिधी मतदार संघातून हेमचंद्र यशवंत माने बिनविरोध निवडून आले आहेत.
इतर मागासवर्गीय, आर्थिक दुर्बल घटक या मतदार संघातून उमेदवारांनी अर्ज न भरल्याने ते कायमस्वरूपी रिक्त राहणार आहेत. उर्वरित १४ जागांसाठी ४० उमेदवार रिंगणात आहेत.
बाजार समितीच्या १७ संचालकांच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला होता. निवडणूक बिनविरोध न झाल्यास २८ एप्रिलला सकाळी ८ ते सायं. ५ या वेळेत मतदान घेण्यात येईल. २९ एप्रिलला मतमोजणी होणार आहे. सहकारी संस्थेचे सहाय्यक निबंधक रोहिदास बांगर हे निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहत आहेत. २० एप्रिलपर्यंत सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेपर्यंत अर्ज मागे घेण्याची मुदत आहे.
बाजार समितीचे माजी सभापती दत्तात्रय ढवळे, किशोर घाग, नित्यानंद दळवी, श्रीधर गवळी यांचे अर्ज छाननीत बाद झाले आहेत. ग्रामपंचायत सदस्य मतदार संघ प्रतिनिधी मतदार संघातून १०, महिला राखीवमधून ३, भटक्या जाती व जमातीमधून २, इतर मागास प्रवर्ग मतदार संघातून ५, कृषी पतसंस्था व बहुउद्देशीय सहकारी संस्था मतदार संघातून २० उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात शिल्लक राहिले आहे. सर्वपक्षीय सहकार पॅनेल स्थापनेबाबतचा विचारविनिमय अद्यापही सुरू आहे. अर्ज मागे घेण्यासाठी आणखी १२ दिवसांचा कालावधी शिल्लक असल्याने तोपर्यंत बिनविरोध निवडणुकीच्या प्रस्तावावर अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे.