रत्नागिरी:- जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती सर्वपक्षीय सहकार पॅनलचे गजानन पाटील यांची तर उपसभापती गुहागरचे सुरेश सावंत बिनविरोध निवड झाली. श्री. पाटील हे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षाचे संचालक असून सांवत राष्ट्रवादी काँग्रेसचे आहेत.
बाजार समितीच्या सभापती, उपसभापती पदाची निवडणुक सोमवारी (ता. 29) झाली. निवडणुक निर्णय अधिकारी म्हणून रोहिदास बांगर, त्यांना साह्य करण्यासाठी सुधीर कांबळे आणि किशोर पाटील होते. बाजार समितीच्या संचालकपदाच्या निवडणुकीत सर्वपक्षीय सहकार पॅनेलने वर्चस्व राखले होते. त्यामुळे पदाधिकारी निवडही बिनविरोध होणार हे निश्चित होते; परंतु सभापतीपदाची लॉटरी कुणाला लागणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले होते. सोमवारी सकाळी सहकार पॅनेलचे प्रमुख जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष डॉ. तानाजी चोरगे यांच्या मार्गदर्शनाखाली सभापतीपदासाठी गजानन पाटील यांचे नाव निश्चित केले गेले. पाटील यांच्यासाठी पालकमंत्री उदय सामंत, किरण सामंत यांनी महत्त्वाची भुमिका बजावली. तसेच राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बाबाजी जाधव आणि आमदार शेखर निकम यांचेही सहकान पॅनलला सहकार्य मिळाले. पाटील यांना सभापतीपद भुषवण्याची ही दुसरी संधी मिळाली आहे.
दरम्यान, सर्वपक्षीय पॅनलमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस, शिंदेेंची शिवसेना आणि ठाकरे शिवसेनेचेही संचालक आहेत. भाजप, काँग्रेसचाही सहभाग आहे. सभापती, उपसभापतीपदावर सर्वांना संधी मिळावी यासाठी सव्वा-सव्वा वर्षांचा कालावधी निश्चित केली आहे. पहिली संधी शिंदे शिवसेनेचे पाटील तर राष्ट्रवादीचे सावंत यांना दिली गेली.