बाजार समितीच्या लिलाव प्रक्रियेत सहभागी तिघे कोरोना बाधित

रत्नागिरी:- रत्नागिरी जिल्हा कृषि उत्पन्न बाजार समितीच्या शांतीनगर -नाचणे येथील मुख्य बाजार आवारावर भाजीपाला लिलाव प्रक्रियेत सहभागी घटकांची जिल्हा आरोग्य यंत्रणा, नगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने कोविड तपासणी करण्यात आली. यामध्ये तीन जण कोरोना बाधित आढळून आले आहेत.

सोमवारपासून (ता. 12) ही तपासणी सुरु झाली आहे. घाऊक व किरकोळ भाजीपाला विक्रेते, शेतकरी, भाजीपाला पुरवठादार,  वाहतूकदार, घरगुती भाजी खरेदी ग्राहक, हमाल, मदतनिस अशा सुमारे 110 व्यक्तींची तपासणी करण्यात आली होती. त्यापैकी एकही व्यक्ती बाधित सापडली नाही. बुधवारी पहाटे साडेचार वाजल्यापासून पुन्हा तपासणी करण्यात आली. आज 138 बाजार आवारातील व्यक्तींची तपासणी झाली. त्यापैकी 3 व्यक्ती बाधित सापडले आहेत. यापुढेही सलगपणे तपासणी मोहीम सुरूच ठेवण्यात येणार आहे. ही तपासणी सुरु करताना भाजीपाला मार्केटमध्ये परजिल्ह्यातून भाजीपाला घेऊन येणारे शेतकरी, पुरवठादार, वाहतूकदार यांचे माफत कोरोना वहन प्रक्रिया होण्याची शक्यता अधिक असल्याने त्यासाठी बाजार आवारावरील स्थानिक घटकांची तपासणी मोहीम सुरु केल्यानंतर अनेक खरेदीदार व अन्य घटक तपासणी कामी अपेक्षित सहकार्य करत नाहीत. तपासणी करताना ती टाळण्याचा अनेकांचा प्रयत्न असतो. आवारात मुद्दाम थांबून रहाणे, मागील दरवाजा व कठडयावरून पळून जाणे, वेळेचे कारण देणे, तपासणी झाली असल्याचे खोटे सांगितले जात आहे. त्यामुळे भाजीपाला व्यापारीही हवालदिल झाले आहेत. तपासणी मोहीम तीव्र होण्यासाठी आरोग्य विभागाकडून प्रयत्न सुरु आहेत. बाजार समिती मार्फत प्रभारी सचिव दिगंबर शिंदे, निरीक्षक पांडुरंग कदम, रोहित सुर्वे व सचिन गुरव, सहाय्यक आशिष वाडकर व विक्रांत घोसाळे उपस्थित होते. बाजार समिती भाजीपाला आवारात कोरोना अनुषंगाने चालू असलेल्या तपासणीसाठी सहकार्य केल्याबद्दल  बाजार समितीचे सभापती संजय आयरे, गजानन पाटील, उपसभापती डॉ. अनिल जोशी आणि संचालक मंडळाने आभार मानले आहेत.