बाजार समितीच्या निवडणुकीत शिंदे गटाच्या एंट्रीने चुरस वाढली

17 जागांसाठी 46 उमेदवारी अर्ज; 20 एप्रिलला चित्र स्पष्ट होणार

रत्नागिरी:- बाजार समितीच्या 17 जागांसाठी 46 उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. यामध्ये सर्वपक्षीय सहकार पॅनल बनविण्यासाठी प्रयत्न सुरु असले तरीही अपेक्षित जागा न मिळाल्याने शिवसेनेच्या ठाकरे गटाकडून पंधरा जागांवर उमेदवार उभे केल्यामुळे निवडणुकीत रंगत आली आहे. 20 एप्रिलला उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत असल्यामुळे तोपर्यंत निर्णय घेण्याची मुभा ठाकरे गटाला देण्यात आली आहे.

सहकार क्षेत्रातील महत्त्वाची निवडणुक म्हणून बाजार समितीकडे पाहिले जाते. या निवडणुकीतही शिवसेनेेचे एकनाथ शिंदे यांच्यासह ठाकरे गटाकडूनही उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आहेत. यापुर्वी बाजार समितीमध्ये सर्वपक्षीय सहकार पॅनेल उभे केले जात होते. त्यामुळे बहूसंख्य जागा बिनविरोध होत होत्या. निवडणुक होऊ नये यासाठी सर्वचस्तवरावर प्रयत्न केले जातात. यंदाही त्यादृष्टीने नियोजन सुरु झाले आहे; परंतु राज्यातील शिंदे-ठाकरे चुरशीचे परिणाम येथेही जाणवू लागले आहेत. उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत संपुष्टात आल्यानंतर 17 जागांसाठी 46 अर्ज दाखल झाले होते. त्यामध्ये इतर मागासवर्गीय (ओबीसी) आणि आर्थिकल दुर्बल घटक या दोन जागांसाठी एकही उमेदवारी अर्ज भरला गेलेला नाही. या जागा कायमस्वरुपी रिक्त राहणार आहेत. व्यापारी गटातून दोन जागांसाठी दोनच उमेदवारी अर्ज आले आहेत. छाननीनंतर यावर शिक्कामोर्तब होईल. 15 जागांसाठी निवडणुक निश्‍चित झाली आहे. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, शिवसेना आणि भाजप यांचे सहकार पॅनेल निश्‍चित झाले आहे. ठाकरे गटालाही यामध्ये समाविष्ट करुन घेण्यासाठी चर्चा सुरु आहे. बाजार समितीमध्ये निवडणुक होऊ नये यासाठी प्रयत्न केले जात आहे. सहकार पॅनेलचे संपुर्ण अधिकार हे दरवर्षीप्रमाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष डॉ. तानाजीराव चोरगे, उपाध्यक्ष बाबाजी जाधव यांच्याकडे देण्यात आले आहेत. त्यामुळे ठाकरे गटाला किती जागा द्यायच्या यावर लवकरच तोडगा काढण्याची शक्यता आहे. सहकार पॅनलसाठी पालकमंत्री उदय सामंतही सकारात्मक आहेत. दरम्यान, उमेदवारी अर्ज माघारीची अंतिम तारीख 20 एप्रिल आहे. तोपर्यंत सहकार पॅनेलमध्ये सहभागी होण्याचा निर्णय ठाकरे गटाकडून अपेक्षित आहे. अन्यथा निवडणुक निश्‍चित आहे.