बाजारात कोकणच्या राजाचा भाव वधारला 

पेटीमागे पाचशे ते हजाराची वाढ

रत्नागिरी:- नवी मुंबईतील फळ बाजारात हापूसला मागणी वाढली आणि आवक घटल्यामुळे आपसूकच दर वधारले आहेत. ही आंबा बागायतदारांसाठी दिलासादायक गोष्ट ठरली आहे. पेटी मागील दर पाचशे ते एक हजार रुपयांनी वधारल्याचे वाशीतील व्यावसायिकांनी सांगितले. बागायतदारही याचा फायदा उठविण्यासाठी सरसावले आहेत.

हवामानातील बदलांचा सामना करत बागायतदारांच्या हाती लागलेल्या उत्पादनातून मिळेल ते उत्पन्न कमवण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. फेब्रुवारीच्या मध्यात काही अंशी हापूस बाजारात जाऊ लागला. मार्च महिन्यात सरासरी 10 हजार पेटी आंबा रत्नागिरी, सिंधुदुर्गमधून जात होता. आठ दिवसांपुर्वी पेटीचा दर दिड ते चार हजार रुपये इतका होता. दर्जेदार आंब्याला चांगला दर मिळत आहे. याच कालावधीत आखाती देशांसह युरोपमध्येही निर्यात सुरु झाल्याने आवक कमी आणि मागणी जास्त अशी परिस्थित निर्माण झालेली आहे. त्याचा फायदा दरावर झाला आहे. पाच डझनच्या पेटीचा दर मुंबईमध्ये पाचशे ते एक हजार रुपयांनी वधारलेला आहे. याचा फायदा कोकणातील बागायतदारांना होत आहे. सध्या फळ बाजारात दररोज 16 ते 18 हजार पेटी हापूस जात आहे. दरवर्षी याच कालावधीत 25 ते 30 हजार पेटी रवाना होत असते. यंदा उत्पादनच कमी असल्याने आंब्याचे प्रमाण कमी आहे. स्थानिक बाजारात दर अधिक असल्यामुळे निर्यातीसाठी माल पाठविणे दलालांना परवडत नाही. कोरोनामुळे हवाई वाहतुकीचा खर्चही अधिक होत असल्याने अनेकांकडून निर्यातीपेक्षा स्थानिक बाजारात आंबा विक्री करणे पसंत केले जात आहे. पहिल्या टप्प्यातील उत्पादनाचा बहर ओसरला असून दुसर्‍या टप्प्यातील आंबा 10 एप्रिलनंतर सुरु होईल. त्यामुळे सध्या हापूसची आवक कमीच राहणार आहे. एप्रिल महिन्यात 50 हजार पेटी दिवसाला दरवर्षी बाजारात दाखल होते. त्यानुसारच परिस्थिती राहील असा व्यावसायिकांचा अंदाज आहे. दोन दिवसांपुर्वी तीस हजार पेटीची मागणी असताना अवघी 19 हजार पेटीच आंबा फळ बाजारात दाखल झाला होता.