बाजारपेठेत चार दिवसात सापडले 37 पॉझिटिव्ह

रत्नागिरी:- एकीकडे व्यापारी बाजारपेठ बंद ठेवण्यास विरोध करीत असताना दुसरीकडे बाजापेठेतच चार दिवसात तब्बल 37 पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहे. बाजापेठेतील व्यापाऱ्यांसाठी विशेष अँटिजेन टेस्ट शिबिर घेण्यात आले होते. यात चार दिवसात 37 पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत.

जिल्हा प्रशासनकडून अत्यावश्यक सेवेत असलेल्या व्यापाऱ्यांच्या कोरोना चाचणीसाठी विशेष मोहीम हाती घेण्यात आली. बाजारपेठेतील व्यापाऱ्यांना मध्यवर्ती जागा ठरावी यासाठी रनप शाळा क्रमांक एकमध्ये शिबीर घेण्याचा निर्णय नगराध्यक्ष बंड्या साळवी, उप नगराध्यक्ष रोशन फाळके आणि स्थानिक नगरसेवक राजेश तोडणकर यांनी घेतला.

पहिल्याच दिवशी 75 जणांची तपासणी करण्यात आली यातून बाजारपेठेत तब्बल 9 पॉझिटिव्ह रुग्ण सापडले. दुसऱ्या दिवशी 31 जणांपैकी 8, तिसऱ्या दिवशी 60 पैकी तब्बल 12 तर 6 सप्टेंबर ला 60 तपासण्या करण्यात आल्या. यातील 8 पॉझिटिव्ह रुग्ण सापडले. चार दिवसात 226 जणांची तपासणी करण्यात आली असून यातील 37 जण पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत.