बाजारपेठेत एटीएम फोडणाऱ्या चोरट्याच्या मुसक्या आवळल्या 

रत्नागिरी:- रत्नागिरी शहरातील धनाजीनाका-मच्छी मार्केट रोडवरील आयसीआयसीआय बँकेचे एटीएम फोडण्याचा प्रयत्न करणाऱ्या चोरट्याच्या मुसक्या आवळण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना यश आले आहे.

शनिवारी रात्री या चोरट्याला ताब्यात घेतले आहे. त्याला चोरीसाठी कोणी कोणी सहकार्य केले याची चौकशी रात्री उशिरापर्यंत सुरू होती.रत्नागिरी शहर पोलिस स्टेशनला भा.दं.वि.क. 461, 380 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.   

दोन दिवसांपूर्वी भर बाजारपेठेत आयसीआयसीआय बँकेचे एटीएम फोडण्याचा प्रयत्न अज्ञात चोरट्यांनी केला होता परंतु एटीएम फोडून आतील रोकड लंपास करण्यात चोरट्यांना यश आले नव्हते. मात्र चोरटे एटीएमच्या सीसीटीव्ही कॅमेरा कैद झाले होते.नजिकच्या दुकानांच्या कॅमेरातही चोरटे कैद झाले होते. सीसीटीव्ही फुटेज च्या आधारे पोलिसांनी चोरट्यांचा माग काढला. त्यातील एकाला जेरबंद करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे.

सदरची कारवाई मा. पोलीस अधीक्षक, रत्नागिरी यांचे मार्गदर्शनाखाली, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. हेमंतकुमार शहा, पो. हवा. मिलींद कदम, शांताराम झोरे, प्रशांत बोरकर, सुभाष भागणे, राकेश बागुल, अरुण चाळके , पो.ना. अमोल भोसले, रमीज शेख व चालक भास्कर धोंडगा यांनी केलेली आहे.