बाजारपेठेतील रस्त्यांचे काँक्रीटीकरण व्यापारी, नागरिकांनी रोखले

दिवाळीनंतर काँक्रीटीकरण करण्याची मागणी

रत्नागिरी:- रत्नागिरी शहरातील रामआळी, मारूतीआळी (बाजारपेठ) येथील रस्त्याच्या प्रस्तावित सिमेंट काँक्रीटीकरणाया शुभारंभ झालेल्या काम थांबवून स्थानिक रहिवासी आणि व्यापाऱ्यांनी रत्नागिरी नगरपरिषदेकडे बुधवारी धाव घेतली आहे. रस्ता विकासाला विरोध नसतानाही, पण तोंडावर आलेल्या दिवाळी आणि एकादशी या महत्त्वाच्या सणांच्या काळात काँक्रीटीकरणाचे काम सुरू करू नये, अशी त्यांची मुख्य मागणी आहे. तातडीने बैठक घेऊन त्यांची बाजू ऐकून घ्यावी, कामातील तांत्रिक बाबी समोर ठेवल्या जाव्यात, त्यानुसार काम केले जावे अशी कैफियत मांडण्यात आली आहे.

येथील महत्वाची बाजारपेठ असलेल्या रामआळी, मारूतीआळी तसेच अन्य भागातील व्यापारीवर्ग आणि येथील रहिवासी यांनी यासंदर्भात बुधवारी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी वैभव गारवे यांची भेट घेतली. त्यांच्याकडे एक निवेदन या रस्ता काँक्रीटीकरणाच्या कामाबाबत सादर केले. या निवेदनात त्यांनी आपली भूमिका स्पष्ट करताना सांगितले. सध्या सणासुदीचे दिवस सुरू आहेत आणि लवकरच दिवाळी तसेच एकादशीचा मोठा बाजार भरणार आहे. या काळात बाजारपेठेत मोठय़ा प्रमाणात आर्थिक उलाढाल होते. जर याच वेळी रस्त्याचे काँक्रिटीकरण सुरू झाले, तर दुकानदारांचे मोठे आर्थिक नुकसान होईल. नागरिकांना प्रचंड गैरसोयीचा सामना करावा लागेल. त्यामुळे हे काम दिवाळी आणि एकादशीचा सण होईपर्यंत पुढे ढकलावे अशी प्रमुख मागणी यावेळी करण्यात आली.

दिवाळी सणावेळी बाजारपेठेत होणारी गर्दी पाहता, नवीन काँक्रिटीकरण होईपर्यंत, सध्या खराब झालेल्या रस्त्याची तात्पुरती डागडुजी (पॅचवर्क) करावी, जेणेकरून रहिवासी व व्यापाऱ्यांची गैरसोय टळेल असे सांगण्यात आले. त्याबरोबर सिमेंट काँक्रीटीकरण करताना रस्त्याची रुंदी, ड्रेनेज लाईन आणि इतर तांत्रिक बाबींबाबत स्थानिक रहिवासी व व्यापारी यांच्याशी चर्चा करूनच अंतिम आराखडा तयार करावा. या संदर्भात, त्यांनी रस्त्याचे स्वरूप कसे असावे, यासंबंधी माहितीपत्रक व नागरिकांच्या सह्यांचे पत्रक देखील निवेदनासोबत जोडले आहे.
रहिवासी व व्यापाऱ्यांच्या सूचनांचा विचार न करता किंवा सणांच्या काळात काम सुरू केल्यास, या कामाला आपला कायम विरोध राहील, अशी स्पष्ट भूमिका त्यांनी नगरपरिषदेकडे मांडली आहे. या गंभीर प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी नागरिकांच्या शिष्टमंडळाने पालकमंत्र्यांसोबत तातडीने एक बैठक आयोजित करण्याची विनंती नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांना केली आहे. या बैठकीत स्थानिक लोकप्रतिनिधी, नगरपरिषद अधिकारी आणि मारुती आळीतील प्रतिनिधी उपस्थित राहिल्यास समस्येवर त्वरित मार्ग निघू शकेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.