दापोली:- शिवजयंतीच्या सुट्टीनिमित्त कुलदैवताच्या बागेत कामासाठी आलेल्या एका ३८ वर्षीय महिला शिक्षिकेचा पाय घसरून पडल्याने दुर्दैवी मृत्यू झाला आहे. पूर्वा प्रशांत शिंदे (रा. कोकाबा आळी, दापोली) असे मृत महिलेचे नाव असून, या घटनेमुळे दापोली परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मयत पूर्वा शिंदे यांचे वडील वणंद गुजरवाडी (ता. दापोली) येथील रहिवासी असून, त्यांची तिथे सुपारीची बाग आहे. १९ फेब्रुवारी रोजी शिवजयंतीची सुट्टी असल्याने पूर्वा शिंदे आणि त्यांचे पती प्रशांत शिंदे हे बागेत कामासाठी गेले होते. सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास बागेत काम करत असताना पूर्वा यांचा अचानक पाय घसरला आणि त्या जोरात छातीवर पडल्या. त्यांचे चुलत भाऊ कैलास जगन्नाथ गुजर हे जवळच शेतात काम करत असताना प्रशांत शिंदे यांनी त्यांना मदतीसाठी हाक मारली. पूर्वा यांना तातडीने उपचारासाठी दापोली येथील केळस्कर नाका येथील डॉ. सरगुरो यांच्या दवाखान्यात नेण्यात आले.
तिथून अधिक उपचारासाठी त्यांना तात्काळ दापोली उपजिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र, सकाळी १० वाजता रुग्णालयातील डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. या घटनेची माहिती मृताचे चुलत भाऊ कैलास जगन्नाथ गुजर यांनी दापोली पोलीस ठाण्यात दिली आहे. पोलिसांनी याप्रकरणी १९ फेब्रुवारी रोजी रात्री आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.
सुट्टीच्या दिवशी कुटुंबाला मदत करण्यासाठी गेलेल्या एका तरुण शिक्षिकेचा असा अपघाती मृत्यू झाल्याने वणंद गुजरवाडी आणि कोकाबा आळी परिसरात शोककळा पसरली आहे.









