केवळ 7 पशुधन अधिकारी; पर्यवेक्षकांची 27 पदे रिक्त
रत्नागिरी:- बर्ड फ्ल्यूचे संकट आ वासून उभे राहीलेले असतानाच तळागाळात यंत्रणा राबवण्यासाठी जिल्हा परिषद पशुविभागाकडे अधिकारी, पर्यवेक्षकांची कमतरताच असल्याची माहिती पुढे आली आहे. जिल्ह्यात अवघे 7 पशुधन विकास अधिकारी कार्यरत असून पर्यवेक्षकांची 27 पदे रिक्त आहेत. चार तालुक्यात पशुधन अधिकारीच नाहीत. त्यामुळे उपलब्ध अधिकार्यांवर कामाचा ताण पडत असून बर्ड फ्ल्यू आलाच तर अतिरिक्त भार पडणार आहे.
ग्रामीण भागातील पशुंची निगा राखण्यासह त्यांच्यावर योग्य ते उपचार करण्यासाठी पशु अधिकार्यांची गरज भासते. ही यंत्रणा हाकण्यासाठी जिल्हा परिषदेचे पशु वैद्यकीय दवाखाने उभारण्यात आलेले आहेत. जिल्ह्यात 73 दवाखाने असून तिथे अधिकारी, कर्मचार्यांची वानवाच आहे. जिल्हा परिषद पशु विभागाच्या सेस योजना, पशु वैद्यकीय सेवा यासह शेतकर्यांकडून येणार्या तक्रारींच निर्मुलन करण्यासाठी या अधिकार्यांची गरज भासते. अनेक पदे रिक्त असल्यामुळे उरलेल्यांकडे अतिरिक्त पदभार दिला गेला आहे. एका अधिकार्याकडे तिन ते चार ठिकाणचे अतिरिक्त पदभार असल्यामुळे नियमित कामही करणे शक्य होत नाही. जिल्ह्याला 33 पशुधन विकास अधिकारी पदे मंजूर आहेत. त्यातील 7 भरलेली असून 26 पदे रिक्त आहेत. गुहागर, संगमेश्वर, राजापूर आणि लांजा येथे एकही पशुधन अधिकारी कार्यरत नाही. तेथील पदभार अन्य अधिकार्यांकडे सोपवण्यात आला आहे. त्याचबरोबर पशुधन पर्यवेक्षकाची 78 पदे मंजूर असून 51 पदे भरलेली आहेत. 27 पदे रिक्त आहेत. गेली अनेक वर्षे ही पदे भरण्यासाठी शासनाकडून प्रयत्न झालेले नाहीत.
दापोली तालुक्यात बर्ड फ्ल्यूमुळे पाच कावळे मृत पावले असून त्यांचा अहवाल बाधित म्हणून आला आहे. त्यामुळे सर्वच यंत्रणा सतर्क झाली आहे. पशुंसह बर्ड फ्ल्यूने बाधित होणार्या पक्षांवर लक्ष ठेवण्यासाठी पशु विभागाकडे जबाबदारी आली आहे. गावागावात प्रचार-प्रसार मोहीम राबवतानाच आजारी पशुंवर वेळेत उपचार करणे आवश्यक आहे. त्यामुळे उपलब्ध पशु विभागाच्या अधिकार्यांवर ताण पडणार आहे. त्यामधून यंत्रणा कोलमडण्याची भिती व्यक्त केली जात आहे.
बर्ड फ्ल्यू झालेेले पक्षी आढळून आल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी पशु विभागाचा आढावा नुकताच घेतला आहे. यामध्ये बहूतांश पदे रिक्त असल्याचे आढळून आले आहे. ती पदे कशी भरता येतील याबाबत अधिकार्यांना सुचना देण्यात आल्याचे रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री अॅड. अनिल परब यांनी सांगितले. त्यामुळे ही पदे लवकरच भरली जातील अशी आशा निर्माण झाली आहे.