रत्नागिरी:- बर्ड फ्ल्यूचा राज्यात शिरकाव झाल्याने अनेकांनी चिकन खाण्याकडे पाठ फिरवली आहे. त्यामुळे चिकन व्यवसाय संकटात सापडला आहे.. मात्र चिकन खाल्ल्याने बर्ड फ्ल्यू होत नाही, याच्या जनजागृतीसाठी रत्नागिरी पंचायत समितीच्या वतीने आज रत्नागिरीत चिकन महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी उपस्थितांना चिकन लॉलीपॉप तसेच अंडी खाण्यास देण्यात आली.
राज्यात बर्ड फ्ल्यूचा शिरकाव झाला, त्यानंतर रत्नागिरी जिल्ह्यातही काही पक्षांचा झालेला मृत्यू हा बर्ड फ्ल्यूने झाल्याचं स्पष्ट झालं होतं. मात्र जिल्ह्यात आतापर्यंत बर्ड फ्ल्यूमुळे कोंबड्यांचा मृत्यू झालेला नाही. पण तरीही भितीपोटी अनेकजण सध्या चिकन खाणं टाळत आहेत. याचा परिणाम चिकन व्यवसायावर झाला आहे. कारण गिऱ्हाईक नाही, आहे तो माल संपत नाही. त्यामुळे कोंबड्यांचा खाद्याचा खर्च वाढतो. त्यात चिकनचे दरही कोसळले आहेत. त्यामुळे चिकन व्यवसायिक पुन्हा एकदा संकटात सापडला आहे. मात्र चिकन खाल्ल्याने बर्ड फ्ल्यू होत नाही हे सांगण्यासाठी प्रशासन स्तरावरही प्रयत्न केले जाताहेत.
याचाच एक भाग म्हणून आज रत्नागिरी पंचायत समितीच्या पशुसंवर्धन विभागाच्या वतीने जिल्हा परिषदेच्या शामराव पेजे सभागृहात चिकन महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी लाॅलीपाॅप आणि अंडी या महोत्सवासाठी आलेल्या लोकांना मोफत खाण्यासाठी देण्यात आली. या महोत्सवात आलेल्या लोकांनी चिकन लाॅलीपाॅपवर ताव मारला. यावेळी चिकन खाण्यासाठी आलेल्या लोकांचे प्रबोधन सुद्धा करण्यात आलं.