रत्नागिरी:- दांडेली ग्रामीण पोलिस ठाण्यात एका घरावर छापा टाकला असता पोलिसांनी बनावट नोटा छापून घेणाऱ्या सहा जणांच्या टोळीला ताब्यात घेण्यात आले आहे. या सहाजणांच्या टोळीत रत्नागिरीतील दोघांचा समावेश असून हे दोघे बनावट नोटा खरेदीसाठी गेल्याचे तपासात पुढे आले आहे. या टोळीकडून साडेचार लाख रुपये किमतीचे बनावट चलन जप्त केले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बनावट नोटांच्या देवाणघेवाणीची माहिती मिळताच एक विशेष पथक तयार करण्यात आले आणि सहा जणांना अटक करण्यात आली. या प्रकरणात आधी शब्बीर (45) आणि शिवाजी एस कांबळे (42) यांना ताब्यात घेतले. यानंतर अन्य चौघाना अटक करण्यात आली. या चार जणांमध्ये किरण एम देसाई (40), गिरीश एन पुजारी (42) हे दोघे रत्नागिरी जिल्ह्यातील आहेत. तर अमर एम नाईक आणि सागर पी कुन्नूरकर यांना अटक करण्यात आली असून हे मूळ बेळगावचे रहिवासी आहेत. हे चौघेही शब्बीर आणि शिवाजी एस कांबळे यांच्याकडून बनावट नोटा खरेदी करीत होते. त्यांच्याकडून गुन्ह्यासाठी वापरल्या जाणार्या दोन मोटारी व छपाई साहित्य व बनावट नोटा जप्त करण्यात आल्या आहेत.