बनावट जन्मदाखला प्रकरणी शिरगाव ग्रामविकास अधिकारी सेवेतून बडतर्फ

रत्नागिरी:- शिरगाव ग्रामपंचायतीकडून बांगलादेशी नागरिकाला बनावट जन्मदाखला दिल्याच्या गंभीर प्रकारात अडकलेल्या तत्कालीन ग्रामविकास अधिकारी वासुदेव सावके यांना अखेर जिल्हा परिषदेने सेवेतून बडतर्फ केले आहे. ही माहिती जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी सागर पाटील यांनी दिली.

जानेवारी २०२५ मध्ये हा घोटाळा उघड झाला होता. मुंबई पोलिसांनी चौकशीदरम्यान एका बांगलादेशी नागरिकाचा शिरगाव येथील जन्मदाखला मिळाल्याचे समोर आले. चौकशीत ग्रामपंचायतीकडे जन्माच्या ३० दिवसांनंतर दाखला देण्याचा अधिकार नसतानाही तो जारी केल्याचे स्पष्ट झाले.

प्रकरण उघड झाल्यानंतर तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी सावके यांना तत्काळ निलंबित केले होते. त्यानंतर गटविकास अधिकाऱ्यांच्या चौकशीत सावके यांनी नियमबाह्यरीत्या दाखला दिल्याचे निष्पन्न झाले. या अहवालाच्या आधारे अंतिम निर्णय घेत जिल्हा परिषद प्रशासनाने त्यांना सेवेतून बडतर्फ करण्याची कारवाई केली.

या प्रकरणातील माजी सरपंच आणि इतर संबंधित कर्मचाऱ्यांची चौकशीही सुरू असल्याचे जिल्हा प्रशासनाने सांगितले आहे.