बदल्या होणार की नाही; गुरुजींचे वाढले टेन्शन

रत्नागिरी:- जिल्हा परिषद शिक्षकांची बदली प्रक्रिया सुरू झाल्यानंतर जिल्ह्यातील 5 हजार 773 शिक्षकांनी ऑनलाईन माहिती अपलोड केली. शिक्षण विभाग तसेच शिक्षकांनी दाखविलेल्या तत्परतेमुळे नोंदणीमध्ये जिल्हा राज्यात प्रथम ठरला आहे. राज्यात त्यातच सत्तांतर झाल्याने बदल्या होणार की नाही, याची चिंता शिक्षकांना वाटत आहे.

कोरोनामुळे मागील दोन वर्षांपासून शिक्षकांच्या बदल्या झालेल्या नाहीत, यावर्षी शिक्षकांच्या ऑनलाईन बदल्या करण्यासंदर्भात शिक्षण विभागाने आदेश दिले. साधारणतः 5 हजार 773 शिक्षक या बदली प्रक्रियेत सहभागी झाले. गेल्या महिन्यात बहुतांश शिक्षक सेवानिवृत्त झाल्याने त्यांना या प्रक्रियेतून बाहेर काढण्यात आले. अवघड आणि सर्वसाधारणक्षेत्रातील निकषांच्या आधारे जिल्ह्यातील शिक्षकांची माहिती 20 जून 2022 पर्यंत ऑनलाइन पोर्टलवर सादर करण्यात आली.

शिक्षकांची माहिती गट शिक्षणाधिकार्‍यांनी मान्य केल्यानंतर 22 जूनला ही माहिती अंतिम करण्यात आली. जिल्ह्यात अडीच हजार शाळांमध्ये साधारणत: पावणे सहा हजार शिक्षक आहेत. या शिक्षकांना टीचर ट्रान्स्फर मॅनेजमेंट सिस्टिम (टीटीएमएस) अर्थात शिक्षक बदली व्यवस्थापन प्रणालीवर नोंदणी करून माहिती प्रमाणित करावी हे नोंदणी ओळखपत्र आणि ओटीपी यापूर्वीच पाठविण्यात आले आहेत.

बदली प्रक्रियेची माहिती अपलोड करण्यात जिल्ह्यातून राज्यात सर्वाधिक प्रतिसाद मिळाला. बदली प्रक्रिया सुरू होण्याच्या टप्प्यावर असतानाच राज्यात सत्तांतर झाले आणि शिक्षण विभागाची ही प्रक्रिया थंडावली. अद्याप मंत्रिमंडळ विस्तार झालेला नाही. त्यामुळे शिक्षण विभागाला बदल्यांच्या आदेशाची प्रतीक्षा आहे.