आक्षेप घेण्यात ३ डिसेंबरची मुदत
रत्नागिरी:- जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदली प्रक्रियेमध्ये बदली पात्र आणि बदली अधिकार पात्र शिक्षकांच्या याद्या जाहीर करण्यात आल्या आहेत. यावरील आक्षेप शिक्षकांनी ३ डिसेंबरपर्यंत शिक्षणाधिकार्यांकडे नोंदवायचे आहेत. बदली प्रक्रियेत समाविष्ट होण्यास नकार असलेल्या ४११ शिक्षकांनी विविध कारणांसाठी सुट घेतल्याचे शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले.
कोरोनामुळे दोन वर्षे रखडलेल्या प्राथमिक शिक्षकांच्या बदल्यांची प्रक्रिया सुरु आहे. यामध्ये पावणेसहा हजार शिक्षकांपैकी चाळीस टक्के शिक्षक बदल्यासाठीच्या यादीत आले आहेत. सुरवातीला १५५९ बदली पात्र आणि १४७२ बदली अधिकार पात्र शिक्षकांची यादी ११ नोव्हेंबरला जाहीर करण्यात आली होती. त्यातील संवर्ग १ म्हणजेच आजारी, परितक्त्या, विधवा, माजी सैनिक आणि संवर्ग २ म्हणजे पती-पत्नी एकत्रीकरण या अंतर्गत पात्र असलेल्या शिक्षकांकडून अर्ज मागविण्यात आले. संवर्ग १ मध्ये १२२७ तर संवर्ग २ मध्ये १०६ शिक्षकांनी अर्ज भरले. अर्ज पडताळणीत चौदा शिक्षकांनी संवर्ग १ मध्ये चुकीची माहीती भरल्याचे उघड झाले. त्यांचे अर्ज बाद करण्यात आले. त्यामुळे १२१३ अर्ज पात्र ठरले. ही प्रक्रिया पुर्ण झाल्यानंतर आजारी किंवा अन्य कारणांसाठी बदली नको अशा शिक्षकांकडून अर्ज मागविण्यात आले होते. या निकषाचा लाभ घेत ४११ शिक्षकांनी बदलीसाठी नकार दिला आहे. ही प्रक्रिया पुर्ण झाल्यानंतर अंतिम बदली पात्र ११४८ शिक्षकांची आणि बदली अधिकार पात्र १४७२ ची यादी मंगळवारी (ता. २९) शिक्षण विभागाकडून जाहीर करण्यात आली आहे. या यादीवर आक्षेप असलेल्या शिक्षकांनी अर्ज देण्यासाठी ३ डिसेंबरपर्यंत मुदत दिली आहे. हे आक्षेप शिक्षणाधिकार्यांकडे नोंदवायचे आहेत. एखाद्या शिक्षकाकडून बदलीसाठी खोटी माहिती दिली, बदली पात्र यादीमध्ये नाव आले अशा प्रकारचे आक्षेप घेता येतात. एखादा शिक्षक दुसर्या शिक्षकाच्या माहितीवरही आक्षेप घेऊ शकतो.