बदलीप्राप्त शिक्षकांची यादी दोन दिवसांत जाहीर

रत्नागिरी:- प्राथमिक शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्यांची प्रक्रिया सुरु झाली आहे. मंगळवारी बदलीप्राप्त शिक्षकांची यादी प्रसिद्ध होणार होती. मात्र राज्यातील काही जिल्ह्याने ही माहिती भरण्यास विलंब केल्याने यादी प्रसिद्ध झाली नाही. आता ही यादी दोन दिवसात प्रसिद्ध होईल, असे सांगण्यात येत आहे.
शिक्षकांच्या बदल्या ऑनलाईन पध्दतीने करण्यासाठी कंपनीची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्याकडून बदल्यांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे; परंतु काही जिल्ह्यांकडून दिलेल्या मुदतीमध्ये माहिती भरण्यात विलंब होत आहे. रत्नागिरी जिल्हा परिषद शिक्षण विभागाकडून तज्ज्ञ अधिकार्‍यांची माहिती भरण्यासाठी नियुक्ती केली आहे.

त्यामुळे दिलेल्या वेळेपुर्वीच काम होत आहे. सध्या जिल्ह्यातील 5 हजार 951 प्राथमिक शिक्षकांपैकी बदली पात्र असणार्‍या शिक्षकांची माहिती पोर्टलवर भरण्याचे काम शनिवारपर्यंत (ता. 7) पुर्ण करावयाचे होते. रत्नागिरी जिल्ह्यातील शिक्षकांची माहिती एक दिवस आधीच भरली गेली होती. रविवारपर्यंत बदली पात्र शिक्षकांची यादी जाहीर होईल अशी अपेक्षा होती.
राज्यातील काही जिल्ह्यांकडून माहिती भरण्यास विलंब झाल्याने यादी जाहीर करण्यात आलेली नसल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
पात्र शिक्षकांच्या यादीमध्ये तिन वर्षे अवघड क्षेत्रातील शाळेत नोकरी, पाच वर्षे एकाच शाळेत आणि दहा वर्षे एकाच केंद्रात काम करणार्यांचा समावेश करावयाचा आहे. जिल्ह्यातील पन्नास टक्के शिक्षक बदल्यांसाठी पात्र ठरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.