रत्नागिरी:- लांबलेल्या पावसामुळे यंदा आंबा कलमे उशिराने येण्याची शक्यता आहे. पावसामुळे 90 टक्के पालवी आली असून 5 ते 7 टक्केच कलमे जून झालेली आहेत. झाडांची संख्या मुबलक आहे तिथे फूट नाही. पालवी आली तर आता लगेच फुटणार नाही. पालवी नसलेल्या झाडांना दीड महिना वाट पाहावी लागेल. आताच्या परिस्थितीवरून आंबा हंगामाचे चित्र स्पष्ट होणार नाही.
मतलई वार्यांमुळे कोकणावर थंडीची दुलई पसरू लागली आहे. गावागावात गारवा जाणवू लागला आहे. मागील आठवड्यात दापोली तालुक्यात पारा 11.09 अंश सेल्सिअसपर्यंत खाली आला होता; तर उर्वरित तालुक्यात 17 अंशापर्यंत पारा होता. संपूर्ण महाराष्ट्रात थंडी पडू लागली तरीही रत्नागिरी जिल्ह्याला प्रतिक्षा होती; मात्र गेल्या चार दिवसात पारा घसरू लागला होता. मोसमी पाऊस यंदा ऑक्टोबर अखेरपर्यंत होता. त्यामुळे थंडीही लांबली. आठ दिवसांपूर्वी रत्नागिरी जिल्ह्यात मतलई वारे वाहू लागले. त्यानंतर हवेत गारवा जाणवू लागला; मात्र कडाक्याच्या थंडीची रत्नागिरीकरांना प्रतीक्षाच होती. हवामान तज्ज्ञांनीही यंदा कडाक्याची थंडी पडेल, असा अंदाज वर्तविलेला होता. त्या अनुषंगाने वातावरणात बदल सुरू झाले आहेत. दापोलीतील कमाल तपमान 32 अंश सेल्सिअस आहे. सकाळी 11 ते दुपारी 3 या कालावधीतच हवेत उष्मा असतो. उर्वरित वेळेत जोराचा वारा आणि गारवा जाणवत आहे. संगमेश्वर, चिपळूण, दापोली, खेड, मंडणगडसह अन्य तालुक्यातील नदीकिनारी भागात थंडीची तीव्रता अधिक जाणवत आहे.
पावसाने विश्रांती घेतल्यानंतर आंबा बागायतदारांनी साफसफाईला सुरुवात केली आहे. पालवी पुर्वीची
फवारणी करण्यात आली आहे. पावसाळ्यात येणारे गवतावरील किटक पालवीचे नुकसान करु नये यासाठी किटकनाशके फवारली जातात. पंधरा दिवसांनी दोन वेळा ही फवारणी केली जाणार आहे. यामुळे तुडतुडा, उंटअळींचा बंदोबस्त होतो. सायपर, लँबडा, मोनोप्रोटोकॉस यासारखी औषधे पाण्यातून मिक्स करुन मारली फवारली जातात असे आंबा बागायतदार राजेंद्र कदम यांनी सांगितले. आंबा बागायतदार प्रसन्न पेठे म्हणाले, ग्रामीण भागातील कातळावर आंबा कलमांना फूट नाही. पालवी आली तरीही ती आता लगेच फुटणार नाही. थंडी लांबली तर हंगाम लांबण्याची शक्यता आहे; मात्र सध्या हंगामाचं चित्र स्पष्ट झालेले नाही. अतिथंडीचाही परिणाम जाणवण्याची शक्यता आहे.