रत्नागिरी:- हवामानात होणारा बदल आंबा पिकांवर परिणाम करत असून, आंबा गळती वाढली आहे. त्याचा फटका पुढील टप्प्यातील आंबा उत्पादनावर होणार आहे. गळती थांबवयाची कशी, या चिंतेत शेतकरी पुन्हा औषध फवारण्या करत आहेत. पंधरा दिवसांपूर्वीपर्यंत आंबा बागायतदार मोहोर वाचवण्यासाठी फवारण्या करत होते. परिणामी, खर्चात मोठी वाढ झाली आहे.
यंदा आंबा उत्पादन वाढेल, अशी शेतकऱ्याला सुरवातीला आशा होती; पण वाढत्या उन्हाचा प्रभाव आंब्याला त्रासदायक ठरत आहे. त्यामुळे यंदा हापूस आंबा हंगाम अपेक्षित भर घालेल, असे चित्र नाही. अद्याप हवेत रात्री गारठा असून दिवसा उष्मा आहे. त्यामुळे आधी मोहोर न आलेल्या सर्व झाडांना आता चौथ्या टप्प्यात मोहोर आला. या मोहोराला अद्याप फळधारणा नसली तरी फुलोरा मात्र चांगला झाला आहे. मोहोर आलेल्या झाडावर वाटाणा, सुपारी, बोरांच्या आकाराची फळे गळू लागली आहेत शिवाय मोहोरावर तुडतुडा, थ्रीप्सचा प्रादुर्भाव आहे. तुडतुड्याचे वेळीच नियंत्रण न केल्यास तयार आंब्यावर तुडतुड्याच्या विष्ठेमुळे काळे डाग पडण्याचा धोका आहे. त्यामुळे सध्या बागायतदारांची मोहोराचे संरक्षण तसेच झाडावरील फळांचे संरक्षण करण्याची जबाबदारी वाढली. फळे लगडलेल्या झाडावरील मोहोर काही शेतकरी काढून टाकत आहेत. मोहोर न काढलेल्या झाडावरील छोटी फळे मात्र गळून पडत आहेत. सध्या आलेल्या मोहोरावर फळधारणा होऊन आंबा बाजारात येईपर्यंत जून उजाडणार आहे. भरपावसाळ्यात बागायतदारांच्या हातात आंबा कितपत येईल व त्याला दर काय मिळेल, केलेला खर्च तरी निघेल का, अशी चिंता भेडसावत आहे; परंतु मोहोर वाचवण्याबरोबर झाडावरील फळांचे रक्षण करण्यासाठी कीटकनाशक फवारणी करावी लागत आहे.
सध्या वाशी मार्केटमधील आंब्याची आवक वाढली आहे. 45 हजार पेट्या विक्रीसाठी येत आहेत. हापूसचा पेटीचा दर दीड हजार ते साडेचार हजारापर्यंत आहे. आंबा सर्वसामान्यांच्या आवाक्यात येऊ लागला असला तरीही तुलनेत आंबा बागायतदारांचा झालेला खर्च पाहता मोठा फटका बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.









