बडव्यांनी उध्दवजींना अंधारात ठेवल्यानेच ही नामुष्की: आ. योगेश कदम

रत्नागिरी:- शिवसेनेच्या घटनेप्रमाणेच विधानसभा अध्यक्षांनी निकाल दिला असून, 1999ची घटना ग्राह्य धरली गेली. 2018 साली पक्षाकडून निवडणूक दाखवली गेली, ती निवडणूक होती, प्रतिनिधी सभा होती की पक्षाची सभा होती हा संभ्रम निर्माण झाला आहे. उध्दवजींच्या आजुबाजुला असणार्‍या बडव्यांनी त्यांना अंधारात ठेवले. पक्षप्रमुख हे पदच घटनेत नसेल आणि त्याला निवडणूक निर्णयाची मान्यता नसेल, त्या पदांनी घेतलेले निर्णय अमान्य होतात. त्याचाच आधारावर निर्णय झाल्याचे आमदार योगेश कदम यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

रत्नागिरीत आलेल्या आ. योगेश कदम यांनी पत्रकारांशी संवाद साधला. अपात्रता सुनावणीमध्ये आ. योगेश कदम यांचा जवाब नोंदवण्यात आला होता. या जवाबात त्यांनी शिवसेना घटनेतील अनेक बाबीं समोर आणल्या. विधानसभा अध्यक्षांनी दिलेल्या निर्णयात आ. कदम यांचा जवाबही महत्वाचा ठरला.
2018मध्ये निवडणूक आयोगाकडे घटना देण्यास देण्यात आली होती. त्यांनीच उध्दवजींची फसवणूक केली आहे. निवडणूक आयोगासमोर त्यांनी काय मुद्दे ठेवले. एकनाथ शिंदे किंवा रामदास कदम यांच्याकडे त्यावेळी जबाबदारी देण्यात आली नव्हती. त्यांच्याकडे अनिल परब यांच्यासारखे निष्णात वकील असताना त्यांनी काय केले असा प्रश्नही आमदार योगेश कदम यांनी उपस्थित केला.

राष्ट्रीय कार्यकारिणी कशाप्रकारे ठेवायची त्यात कुणाकुणाला स्थान द्यायचे हे देखील शिवसेनेच्या घटनेत नमुद केलेले आहे. यांनी मनमानीपणे राष्ट्रीय कार्यकारिणी तयार केली असल्याचा आरोप आमदार योगेश कदम यांनी केला. निवडणूक आयोगाकडे प्रत्येक पक्षाच्या घटनेला महत्व आहे. शिवसेनेची घटना हा पक्षाचा पाया आहे. घटनेमध्ये एकाच व्यक्तीला अधिकार द्या असे कुठेही सांगितलेले नाही. त्याउलट जाऊन उध्दवजींनी सर्व अधिकार आपल्याकडे ठेवल्याचेही आ. कदम यांनी सांगितले.
खा. श्रीकांत शिंदे यांच्याकडे कोणते पद आहे. ते शिवसेनेचे उपनेते नाहीत, शिवसेनेचे नेते नाहीत, ते शिवसेनेचे खासदार आहेत म्हणून प्रचार करतायत. माझ्याकडेही कोणते पद नाही परंतु शिवसैनिक म्हणून आणि आमदार या नात्याने मी प्रचार करु शकतो. बाळासाहेबांचे चिरंजीव म्हणून उध्दवजींकडे पद असे कुठेही शिवसेनेच्या घटनेत नमूद करण्यात आलेले नाही. बाळासाहेबांचे तुम्ही चिरंजीव आहात म्हणून शिवसेना तुमची असे शिवसेनेच्या घटनेत नाही. स्वत:च्या पक्षाची घटना सुध्दा त्यांना माहिती नाही हे त्यांचे अज्ञान असल्याचे दिसून आल्याचे आ. योगेश कदम यांनी सांगितले.