बचाव कार्यासाठीचे अत्याधुनिक साहित्य ठेवण्यासाठी जागा द्या; रत्नदुर्ग माउंटेनिअर्सची रनपकडे मागणी 

रत्नागिरी:- रत्नदुर्ग माउंटेनिअर्स संस्थेकडे बचाव कार्यासाठीचे अत्याधुनिक साहित्य उपलब्ध आहे. ते ठेवण्यासाठी अपेक्षित जागा उपलब्ध नाही. ती जागा नगरपालिकेने दिली तर साहित्य एकत्रित ठेवणे शक्य होईल. त्यासाठी सहकार्य करावे अशी मागणी रत्नदुर्ग माऊंटेनिअर्स्तर्फे निवेदनाद्वारे केली आहे.

रत्नदुर्ग माउंटेनिअर्स ही रत्नागिरीमधील गिर्यारोहण क्षेत्रातील पहिली नोंदणीकृत जुनी संस्था आहे. या संस्थेने पंचेचाळीसपेक्षा अधिक साहसी प्रशिक्षण शिबिरातून (निवासी) 3 हजार पेक्षाही जास्त मुलामुलींना गिर्यारोहणाचे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण दिले. सामाजिक बांधिलकीच्या जाणिवेतून खूप ठिकाणी रेस्क्यू ऑपरेशन्सही राबविली. त्यात प्रामुख्याने 22 जुलैला आलेल्या चिपळूणमधील महापुरात सर्वात प्रथम जाऊन पहिल्या दिवशी 70 जणांना व दुसर्‍या दिवशी ऐका बेटा वरून 50 जणांना सुरक्षित स्थळी नेण्यास टीम यशस्वी झाली. या रेस्क्यूनंतर लगेचच पूरग्रस्तांना किट वाटप, स्वच्छता मोहीम डॉक्टर ना मेडिकल किट वाटप या सारख्या मदतीसाठी वाहून घेतले आहे. जिल्ह्यातील भौगोलिक परिस्थिती पाहता आंबेनळी घाटांमधील दुर्घटना किंवा चिपळूणमधील पुरजन्य परिस्थिती जिल्ह्यात किंवा तालुक्यात कुठेही उद्भवू शकते. जिल्ह्याला अपघात किंवा अशा पूरसदृश्य समयी रत्नदुर्ग स्वत:ची रेस्क्यू टीम अत्याधुनिक साधनांसह नेहमीच तयार असते. जागा उपलब्ध नसल्यामुळे किंवा एखादे ऑफिस नसल्यामुळे अत्याधुनिक साहित्य थोड्या-थोड्या प्रमाणात प्रत्येकाच्या घरी ठेवावी लागतात. बचावकार्यचे साहित्य ठेवण्यासाठी जागा उपलब्ध झाली तर ती सर्व साधने व्यवस्थित राहतील. ती एकाच जागी ठेवून कमीत-कमी वेळेत मदत कार्याच्या ठिकाणी पोहोचू शकतो. त्यासाठी जागेची नितांत आवश्यकता असून कृपया नगरपालिकेकडून रत्नदुर्ग माउंटेनिअर्स संस्थेसाठी बचाव कार्य करण्याच्या उद्देशाने जागा उपलब्ध करून द्यावी अशी मागणी रत्नदुर्ग माऊंटेनिअर्स्तर्फे करण्यात आली आहे.