रत्नागिरी:- जिल्ह्यातील अंगणवाडी सेविका, मदतनीस आणि बचत गटातील महिलांच्या माध्यमातून गावागावात आधार कार्ड सर्वेक्षण मोहीम सुरू करण्यात आली आहे. शासकीय योजनांसाठी आवश्यक असणारे आधार नंबर या माध्यमातून गोळा केले जात असून स्थानिक लोकांच्यात मात्र या मोहिमेबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. आधार कार्ड नेमके कशासाठी घेण्यात येत आहे, असा सवाल गावागावातून विचारला जात आहे.
पंचायत समितीच्या माध्यमातून हे काम एकात्मिक बालविकास सेवा योजनेच्या कर्मचार्यांवर सोपविण्यात आले आहे. वाडीवस्तीवर फिरुन अंगणवाडी सेविका, मदतनीस, बचत गटातील महिला व अन्य कर्मचारी कुटुंबप्रमुख व त्या घरातील अन्य लोकांचे आधार क्रमांक गोळा करीत आहेत. गावचे रहिवासी असणार्या लोकांचे आधार क्रमांक घेतले जात आहेत. वाड्यावस्त्यांवर हे सर्वेक्षण सुरू आहे. मात्र, या मोहिमेबाबत गावागावातील काही सुजाण नागरिक आक्षेप घेत आहेत. आधार क्रमांक नक्की कशासाठी घेण्यात येत आहे? आधार क्रमांक हा व्यक्तीगत आहे, तो कोणी कोणासाठी वापरायचा हा त्या कार्डधारकाचा अधिकार आहे. असे सवाल गावागावात उपस्थित होत आहेत. आधारचा गैरवापर देखील होऊ शकतो. अनेकवेळा ऑनलाईन फसवणुकीमध्ये आधार क्रमांकाचाच वापर केला जात आहे. या पार्श्वभूमीवर या मोहिमेबाबत गावामध्ये असंतोष व्यक्त होत आहे.
आधार क्रमांक ही त्या व्यक्तीची ओळख आहे. मतदान किंवा अन्य शासकीय योजनांसाठी त्याचा वापर केला जातो. असे असताना हे आधार कार्ड का घेतले जात आहे असा सवाल ग्रामस्थ विचारत असून मोहिमेबद्दल नाराजी व्यक्त करीत आहेत.
या संदर्भात येथील गटविकास अधिकारी उमा घार्गेपाटील यांना विचारले असता, संपूर्ण जिल्ह्यात आधार क्रमांक घेण्याची मोहीम सुरू आहे. ग्रामपंचायत स्तरावर या आधार क्रमांकाचे रजिस्टर ठेवले जाणार आहे. लोकांच्या आधार क्रमांकाचा कोणताही गैरवापर होणार नाही. जलजीवन मिशन, प्रधानमंत्री किसान सन्मान योजना व अन्य योजनांसाठी आधार क्रमांक लागतो. लाभार्थ्याला या योजनांचा लाभ देण्यासाठी आधार क्रमांक नसल्याने अनेक अडचणी होतात. त्यामुळे भविष्यात योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी एकत्रित आधार क्रमांकाचे रजिस्टर केले जाणार आहे व ग्रा.पं. स्तरावर ते ठेवले जाईल. या क्रमांकाचा कोणताही गैरवापर होणार नाही. गैरवापर झाल्यास फौजदारी करण्याचा अधिकारही प्रत्येकाला आहे, असे सौ. घार्गेपाटील यांनी सांगितले.









