रत्नागिरी:- फराळासह आकाशकंदील, मातीच्या पणत्या, दिवाळी साहित्य विक्रीतून महिला बचत गटांनी दिवाळी सणात सुमारे २५ लाखाहून अधिक आर्थिक उलाढाल केल्याचा अंदाज वर्तविला आहे. जिल्ह्यातील विविध शासकीय कार्यालये, बाजारपेठेतील ठिकाणांसह मुंबई व पुण्यामध्येही बचत गटांचा फराळ पोचला आहे.
कोरोनानंतर बचत गटांच्या अर्थकारणाला दिशा मिळत असून महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानातील (उमेद) गटांनी भरारी घेतली आहे.
आर्थिक सबलीकरणासाठी शासनस्तरावर महिलांना प्रोत्साहन दिले जात आहे. त्यासाठी गावागावांमध्ये महिला बचत गटांची स्थापना करण्यात आली आहे. जिल्ह्यात सुमारे चौदा हजार बचत गट आहेत. कोरोना पश्चात निर्बंधमुक्त दिवाळी साजरी झाली. बालदोस्तांपासून प्रौढांपर्यंत सर्वचजणांनी या सणाचा आनंद घेतला. दिवाळीमध्ये अभ्यंगस्नानासह चकल्या, करंजी, लाडू, चिवडा यासह विविध प्रकारच्या फराळाचा आस्वाद घेतला जातो. घरामध्ये बनवलेल्या या फराळाची चव न्यारीच असते. ग्रामीण भागामध्ये महिला बचत गटांकडून आलेल्या फराळाला मोठी मागणी होती. या सणाचा व्यावसायिक फायदा मिळवण्यात उमेदच्या महिला बचत गटांना यश आले आहे. उमेदमार्फत जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद, विविध शासकीय कार्यालये, गावागावातील मुख्य बाजारपेठांमध्ये बचत गटांचे स्टॉल उभारण्यात आले होते. शंभरहून अधिक ठिकाणी अशी व्यवस्था केली गेली. याचबरोबर मुंबई, पुण्यासारख्या शहरी भागातून बचत गटातील महिलांच्या वैयक्तिक संपर्कामधूनही फराळाची मागणी आली होती. दिवाळीच्या पुर्वसंध्येपर्यंत मागणीनुसार फराळ पोचता करण्यात आला.
दिवाळी फराळाबरोबरच आकाशकंदील, डेकोरेटीव्ह पणत्या, प्रकाश व्यवस्थेचे साहित्य, सुशोभिकरणासाठी आवश्यक कागदी पताके तयार करुन त्याची अनेकांनी विक्री केली. कोरोनामुळे मागील दोन वर्षे दिवाळीचा आनंद घेता आलेला नव्हता; मात्र यावर्षी निर्बंधमुक्त दिवाळी लोकांनी साजरी केली. दिवाळीनिमित्त गावाकडे आलेल्या चाकरमान्यांनीही बचत गटांच्या फराळाची चव चाखली. दोन वर्षांपुर्वी दिवाळीमध्ये १७ लाखाची उलाढाल झाली होती. यावर्षी नियोजनबध्द कामामुळे आठ लाखाची भर पडली असून सुमारे पंचवीस लाखाची उलाढाल झाल्याचा अंदाज आहे.
दरम्यान, दिवाळीत बचत गटांना विक्रीसाठी पर्याय उपलब्ध व्हावेत म्हणून जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी किर्तीकुमार पुजार यांच्यासह उमेदच्या प्रकल्प संचालक श्रीमती एन. बी. घाणेकर, जिल्हा अभियान व्यवस्थापक अय्याज पिरजादे यांनी दिवाळीपुर्वीच नियोजन केले होते. त्याची अंमलबजावणी तालुकास्तरावरही प्रत्यक्षात केल्यामुळे महिलांना बाजारपेठ मिळाली.









