बंड्या साळवी शिंदे सेनेत गेले तरी आम्हाला दुःख होणार नाही: विनायक राऊत

रत्नागिरी:- ठाकरे शिवसेनेतून तालुकाप्रमुख पदाचा राजीनामा दिलेले प्रदीप उर्फ बंडय़ा साळवी यांनी शिंदे सेनेत प्रवेश केला तरी त्याचे आम्हाला अजिबात दुःख वाटणार नाही. पक्षातून जाणारे जातील, पण जे ठाकरे सेनेत निष्ठावंत राहतील, त्याच्या ताकदीवर आम्ही शिवसेना पुन्हा नव्या जोमाने, निर्धाराने उभी करणार. त्याबाबत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंची आम्हाला शिकवण असल्याचे पक्षाचे सचिव, माजी खासदार विनायक राउत यांनी सांगितले आहे.

ठाकरे शिवसेनेतील राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर विनायक राउत यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, जोपर्यंत गद्दारी, बेईमानीला खतपाणी घालणारे राज्यकर्ते राज्यात आहेत, तोपर्यंत या राजकारणात बेईमानी राहणार असल्याचा टोला लगावला आहे. पण आपली लोकशाही खूपच सक्षम आहे, त्यामुळे गद्दारांना गाडण्याचे काम ठाकरे शिवसेनेतील निष्ठावंतांनी केले आहे. म्हणून फार काळजी करण्याचे कारण नसल्याचे राउत यांनी म्हटले आहे.

रत्नागिरीतील ठाकरे शिवसेनेतील पदाधिकाऱ्यांच्या पक्ष सोडण्याया बाबतीत राउत यांनी म्हटले की, तालुकाप्रमुख बंडय़ा साळवी यांनी आपल्या तालुकाप्रमुख व सदस्यत्वाचा देखील राजीनामा दिलेला आहे. मला पुढच्या पिढीला वाव देण्याच्या हेतूने राजीनामा दिल्याचे साळवी यांनी म्हटले आहे. पण ते शिंदे सेनेत प्रवेश करणार असल्याचे आता बोलले जातेय. साळवी गेले तरीही त्यांच्यापेक्षा अधिक निष्ठावान पदाधिकारी ठाकरे शिवसेनेत त्या पदी उभे राहतील. त्यामुळे पक्षाच्या दृष्टीने आम्हाला अजिबात चिंता करण्याची गरज वाटत नसल्याचे राउत यांनी सांगितले.

ठाकरे शिवसेनेतून गद्दार गेले, आले तरी निष्ठावंतांची मजबूत फळी आजही आहे. त्यामुळे गद्दारांच्या काळजीने आम्ही अजिबात झुरून जाणार नाही. जे आता पक्षात आहेत ते निष्ठावंत आहेत. त्यांची निष्ठा आणि पक्षावरील श्रध्दा ही पक्षाच्या उत्कर्षाची नांदी आहे. पुन्हा ठाकरे शिवसेना एकजुटीने उभी केली जाणार आहे. आज गद्दारांनी निष्ठा हा शब्दा नेस्तनाबूत करून टाकला असल्याचे पक्षाचे सचिव विनायक राउत यांनी सांगितले.