नगर पालिका, नगर पंचायतींचे चित्र आज स्पष्ट होणार
रत्नागिरी:- जिल्ह्यातील ४ नगरपालिका आणि ३ नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीचे चित्र शुक्रवारी सायंकाळी स्पष्ट होणार आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी शुक्रवार अंतिम दिवस आहे. अनेक ठिकाणी महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये बंडखोरी झाली असून शुक्रवारी सायंकाळी जिल्ह्यातील नगर पालिका आणि नगर पंचायतींच्या लढतीचे चित्र स्पष्ट होणार आहे.
नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात नगर पालिका आणि नगर परिषदांच्या निवडणुकांची घोषणा करण्यात आली होती. या मध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील रत्नागिरी, चिपळूण, राजापूर, खेड, लांजा, देवरुख आणि गुहागर यांचा समावेश होता. 10 नोव्हेंबर पासून उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली. उमेदवारी अर्ज भरण्याच्या पहिल्या चार दिवसात उमेदवारांचा थंडा प्रतिसाद मिळाला. महायुती आणि महाविकास आघाडी याबाबत निर्णय न झाल्याने पहिल्या चार दिवसात केवळ हाताच्या बोटावर मोजता येतील इतकेच उमेदवारी अर्ज जिल्हाभरात दाखल झाले होते.
अंतिम तीन दिवसात उमेदवारी अर्ज भरण्यासाठी मोठी झुंबड उडाली. 17 नोव्हेंबरला तर सर्वाधिक उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले. चार नगर पालिका आणि तीन नगर पंचायतींसाठी एकूण नगराध्यक्षपदासाठी 56 नगरसेवकपदासाठी 635 अर्ज प्राप्त झाले. प्राप्त झालेल्या अर्जांची 18 नोव्हेंबर रोजी छाननी प्रक्रिया करण्यात आली. या छाननी प्रक्रियेत नगराध्यक्ष पदासाठीच्या उमेदवारांचे ८ अर्ज बाद झाले, तर नगरसेवकपदांचे ६७ अर्ज बाद झाले. बहुसंख्य अर्ज हे एबी फॉर्म नसल्यामुळे अवैध ठरले आहेत. मात्र अपक्ष म्हणून दुसरा अर्ज भरलेला असल्याने संबंधित उमेदवारांना दिलासा मिळाला. छाननीनंतर नगराध्यक्षपदासाठी ५० उमेदवार तर नगरसेवक पदासाठी ५४४ उमेदवार रिंगणात आहेत.
उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी शुक्रवार 21 नोव्हेंबर अंतिम मुदत आहे. जिल्ह्यातील प्रत्येक नगर पालिका आणि नगर पंचायतीमध्ये बंडखोर उमेदवारांना शांत करण्याचे आव्हान प्रत्येक पक्षासमोर आहे. शुक्रवारी सायंकाळी तीन वाजेपर्यंत उमेदवारी मागे घेण्याची मुदत असून सायंकाळ नंतर लढतीचे खरे चित्र स्पष्ट होणार आहे.









