फुरसे जातीचा साप चावल्याने महिलेचा मृत्यू

रत्नागिरी:- शेतात बेनणीचे काम करत असताना महिलेला फुरसे जातीचा साप चावला. अधिक उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. तेथील वैद्यकीय अधिकारी श्रेयस माईल यांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. हर्षदा हरेश बाईत (वय ३५, रा. तांबे पाखाडी पडवे ता. राजापूर) असे मृत महिलेचे नाव आहे. ही घटना बुधवारी (ता. २०) जुलैला चारच्या सुमारास शेतात बेनणी करत असताना घडली.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार हर्षदा बाईत या शेतात काम करत असताना दुपारी सव्वा बाराच्या सुमारास त्यांच्या हाताच्या बोटाला फुरसे जातीचा साप चावला. त्यांची जाऊ योगिता संतोष बाईत यांनी तात्काळ गावातील ग्रामस्थांच्या मदतीने उपचारासाठी प्रथम ग्रामीण रुग्णालय राजापूर येथे दाखल केले होते. तेथे तिची तब्बत जास्त बिघडल्याने अधिक उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले होते. उपचार दरम्याने तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तिला तपासून मृत घोषित केले. राजापूर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.