स्थानिकांच्या माणुसकीमुळे विद्यार्थ्यांना आधार, मोठी दुर्घटना टळली
संगमेश्वर:- गणपतीपुळे येथून महाडकडे जाणारी बीड जिल्ह्यातील धारूर येथील शालेय विद्यार्थ्यांची सहल बस मंगळवार 10 फेब्रुवारी रोजी सकाळी सुमारे दहा वाजण्याच्या सुमारास संगमेश्वर तालुक्यातील फुणगूस येथील मुख्य रस्त्यावर भोसलेवाडी परिसरात अपघातग्रस्त झाली. रस्त्याच्या कडेला बस पलटी झाल्याने काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र सुदैवाने या अपघातात कोणतीही मोठी जीवितहानी झाली नसून केवळ एक-दोन विद्यार्थ्यांना किरकोळ दुखापत झाली आहे.
चाटे पब्लिक स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, धारूर (जिल्हा बीड) येथील विद्यार्थ्यांची ही शैक्षणिक सहल होती. MH 12 / HB 0114 क्रमांकाच्या बसमध्ये इयत्ता चौथी ते आठवीतील ३५ विद्यार्थी, ३ शिक्षक व २ मावश्या असे एकूण ४१ प्रवासी होते. बस चालक कृष्णा शिरीषराव चाटे हे वाहन चालवत होते. फुणगूस येथे बस आल्यावर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने बस रस्त्याच्या कडेला उलटली.
अपघाताच्या वेळी मोठा आवाज झाला आणि बसमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांच्या रडण्याचा व ओरडण्याचा आवाज परिसरात घुमू लागला. हा आवाज ऐकताच स्थानिक नागरिक मदतीसाठी धावून आले. अपघाताचे दृश्य भयावह असतानाही स्थानिकांनी प्रसंगावधान राखत बसमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांना एकामागून एक सुरक्षितपणे बाहेर काढले. घाबरलेली व रडणारी मुले पाहून अनेकांच्या डोळ्यांत पाणी आले.
या अपघातात साक्षी गायके (१४), अरुणा मैद (३६), सृष्टी गोरे (९), मयुरी विलास पवार (१४), गणेश रमेश गोरे (१४), प्रीतम देवराव रोडे (१५), अजय सतीश नागस (९), विठ्ठल नानोबा हुलगे (१३), रितेश विलास बाडये (९), राखू विठ्ठल घोडके (३०), सारिका बालाजी कवके (३४), ओंकार सुधीर गिरी (१२) आणि प्रताप प्रकाश फड (१२) यांना किरकोळ दुखापत झाली असून फुणगूस प्राथमिक आरोग्य केंद्रात त्यांच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले. सुदैवाने सर्वजण सुरक्षित आहेत.
अपघातानंतर विद्यार्थ्यांच्या पुढील प्रवासाची व्यवस्था होईपर्यंत थुळवाडी व परिसरातील नागरिकांनी माणुसकीचा उत्तम आदर्श घालून दिला. फटकरे गुरुजी, थूळ गुरुजी तसेच थुळवाडीतील ग्रामस्थांनी विद्यार्थ्यांची व शिक्षकांची राहण्याची संपूर्ण व्यवस्था केली. घाबरलेल्या मुलांना धीर देणे, त्यांची जेवण-पाण्याची सोय करणे आणि प्रेमाने संवाद साधणे असे मायेचे वातावरण निर्माण करण्यात आले.
फुणगूस गावचे सरपंच अशोक पांचाळ यांनी विद्यार्थ्यांसाठी नाश्त्याची व्यवस्था केली, तर दुपारच्या जेवणाची व्यवस्था सेवानिवृत्त शिक्षक विजय फटकरे यांनी केली. गरजेची प्रत्येक मदत स्थानिकांनी स्वतःहून पुढाकार घेऊन केली. अनोळखी असूनही या मुलांना आपलेच समजून केलेली मदत पाहून अनेकांनी समाधान व्यक्त केले.
या अपघातात स्थानिक नागरिक, ग्रामस्थ, शिक्षक व सामाजिक कार्यकर्त्यांनी दाखवलेली तत्परता, संवेदनशीलता आणि माणुसकीमुळे मोठी दुर्घटना टळली असून परिसरात त्यांच्या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.









