फिर एक बार मोदी सरकार, अब की बार ४५ पार: मुख्यमंत्री

राजापूर:- हिंदू हृदयसम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे आणि कोकण व कोकणी माणसाचं अतुट असं नातं आहे. या कोकणी माणसाने शिवसेना वाढविली आणि मनामनात, घराघरात रूजवली, त्यामुळे संपुर्ण कोकणी जनता ही बाळासाहेबांच्या शिवसेनेच्या पाठीशी आहे याची मला खात्री आहे. त्या कोकणी माणसाशी संवाद साधताना, त्यांना भेटताना अत्यानंद होत आहे. भविष्यात कोकणच्या सर्वांगिण व समृध्द अशा विकासासाठी शिवसेनेला, आमच्या महायुतीला साथ द्या असे आवाहन करताना फिर एक बार.. मोदी सरकार आणि अब कि बार महाष्ट्रातुन ४५ महायुतीचे ४५ खासदार पार असा नारा राज्याचे मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे यांनी दिला.

जे परदेशात जाऊन भारताचा अवमान करतात त्यांना तुंम्ही निवडून देणार काय? असा खडा सवाल उपस्थित करताना देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचे काश्मिर मधीर ३७० कलम व अयोध्येत राम मंदिराची निर्मिती करण्याचे स्वप्न पुर्ण केले आहे. त्यामुळे आज देशाला नरेंद्र मोदी यांच्यासारख्या कणखर नेतृत्वाची गरज असून तुंम्ही फक्त साथ द्या विकासाची गंगा आपल्या दारी आल्याशीवाय रहाणार नाही असा विश्वास ना. शिंदे यांनी उपस्थितांना दिला.

बाळासाहेबांच्या विचारांचे आंम्ही वारसदार आहोत, त्यांच्या संपत्तीचे नाहीत असे खडे बोल सुनावत विझलेल्या मशाली कधी पेटत नसतात असा टोलाही ना. शिंदे यांनी लगावला आहे.

शिवसेनेच्या शिवसंकल्प अभियानाच्या राजापूर शहरातील वरचीपेठे येथील राजीव गांधी क्रिडांगणावर जाहिर सभेत मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर राज्याचे उद्योगमंत्री तथा रत्नागिरीचे पालकमंत्री ना. उदय सामंत, शिक्षण मंत्री ना. दीपक केसरकर, लोकसभा संपर्क प्रमुख रवींद्र फाटक, शिवसेना नेत्या मिनाताई कांबळे, शितल म्हात्रे, कृष्णाताई विश्वासराव, माजी आमदार सदानंद चव्हाण, युवा नेते किरण सामंत, शिवसेना रत्नागिरी जिल्हा प्रमुख राहुल पंडीत, शशिकांत चव्हाण, उपजिल्हाप्रमुख अशफाक हाजू, तालुका प्रमुख दीपक नागले, सिंधुदुर्ग जिल्हाप्रमुख संजय आग्रे, अशोक दळवी आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.

याप्रसंगी बोलताना ना. शिंदे यांनी गेल्या साडेनऊ वर्षात केंद्रातील मोदी सरकारच्या माध्यमातुन घेण्यात आलेल्या विविध निर्णयाची व योजनांची माहिती दिली. तर राज्यात झालेल्या सत्तांतरानंतर गेल्या दिड वर्षात कशा प्रकारे राज्यातील विकासाला गती देण्यात आली, शेतकरी, सर्वसामान्य जनता, महिलां यांच्यासाठी कशा प्रकारे शासनाने विविध योजना राबविल्या व लोकोपयोगी निर्णय घेतले याचा लेखा जोखा मांडला. हे काम करणारे सरकार आहे, सर्वसामान्य जनतेचे सरकार आहे, आंम्ही घरात बसून नाही तर जनतेत जाऊन काम करणारी माणसं आहोत असा टोलाही ना. शिंदे यांनी यावेळी लगावला. सरकार आपल्या दारीच्या माध्यमातुन राज्यातील दोन कोटी जनतेला विविध योजनांचा घरबसल्या लाभ मिळवून दिल्याचे ना. शिंदे यांनी सांगितले.

हिंदू ह्दय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचे आंम्ही कडवट आणि निष्ठावान शिवसैनिक आहोत, बाळासाहेबांची शिवसेना आमच्याकडे आहे, शिवसेनेचा धनुष्यबाण आमच्याकडे आहे. प्रभू श्री रामचंद्राचे हा धन्युष्यबाण आहे, या धनुष्यबाणाने हिंदू द्वेष्टयांचा नायनाट करण्याची वेळे आता आलेली आहे. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणूकीत तुंम्ही महायुतीचे दुत व्हा आणि विरोधकांना त्यांची जागा दाखवून द्या असे आवाहनी ना. शिंदे यांनी यावेळी केले.

एनडीए आघाडीचाही त्यांनी यावेळी समाचार घेतला. तीन राज्यातील विधानसभा निवडणूकीत खुशीत गाजरे खात होते, त्यांना जनतेने पराभूत करून जागा दाखवून दिली आहे. मोदींनी त्यांना चांगलाच झटका दिला. तुंम्हाला देशाची बदनामी करणारा पंतप्रधान हवाय की देशासाठी समर्पीत भावनेने काम करणारे नेतृत्व हवेय असा सवाल उपस्थित करत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अब की बार ४०० पार ठरवलेलच आहे. त्यामुळे आता फिर एक बार मोदी सरकार आणि राज्यात अबी की बार ४५ पार हा आमचा नारा असल्याचे ना. शिंदे यांनी सांगितले.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंचे स्वप्न पुर्ण केले. काश्मिर मधील ३७० कलम रद्द केले. अयोध्येत राममंदिराची निर्मिती केली. जगात भारताचा दबदबा निर्माण केला. आज त्यांना शिव्या देण्याचे काम ही नतद्रष्ट मंडळी करत आहेत त्यांना धडा शिकवा असे आवाहन त्यांनी यावेळी केली.

हा कार्यकर्त्यांचा मेळावा आहे. या मेळाव्याला तुम्ही केलेली गर्दी लक्षात घेता विरोधी पक्षांचे डिपॉझीट जप्त झाल्याशिवाय राहणार नाही असा निर्धार श्री. शिंदे यांनी सुरूवातीला व्यक्त केला.

दिड वर्षांपुर्वी तुमच्या आर्शिवार्दाने सरकार स्थापन झाल्यावर महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राबाहेरही पायाला भिंगरी लावून फिरतोय. अनेक भूमीपूजने, लोकार्पण केली, प्रकल्पांची भूमीपूजने केली. परंतु पक्ष संघटनेलाही वेळ दिला पाहिजे यासाठी आज आलोय. ज्या कोकणी माणसाने शिवसेना प्रमुखांवर जीवापाड प्रेम केले. शिवसेनेवर प्रेम केले त्यांच्याशी संवाद साधण्यासाठी संधी या निमित्ताने मला मिळाली. मुंबई ठाणे शिवसेनेचे शरीर तर रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्हे ही दोन फुफुसे आहेत. कोकणी माणसाने एकदा ठरवले कि त्याला कुणीही थांबवू शकत नाही.

मला काय मिळेल यापेक्षा आंम्ही राज्याला काय मिळेल याचा आंम्ही विचार केला आणि धाडसाने निर्णय घेतला. हे संपुर्ण जगाने पाहिले आहे. अनेकांना या निर्णयाबाबत चिंता होती, मात्र आंम्ही घेतलेली भूमिका योग्य होती, कारण आमची नितीमत्ता आणि विचार साफ आहेत त्यामुळे यश आले. हे काम करणारे सरकार आहे आरोपांना कामाने उत्तर देणार असल्याचे त्यांनी सांगितले.

नाव गेलं की पुन्हा येत नसंत, नाव जपायचे असते, सत्तेपेक्षा नाव मोठं असतं ते जपायचं असते, विचार मोठे असतात आणि आयडॉलॉची महत्वाची असते, आम्ही बाळासाहेबांचे विचार पुढे नेतोय त्यांच्या विचारांचे आंम्ही वारसदार आहोत, संपत्तीचे नाही त्यांचे विचार हीच आमची संपत्ती असल्याचे शिंदे यांनी यावेळी ठणकावले.

राममंदिर हा राजकारणाचा विषय नसून तो आमच्या श्रध्देचा, अस्मीतेचा आणि भावनेचा विषय आहे. जे यावर राजकारण करतात त्याचे परिणाम ते भोगतीलच. स्वर्गिय बाळासाहेब असते तर त्यांनी मोदींचे अभिनंदन केले असते, मात्र आज टिका करतायत. जनता त्यांना त्यांची जागा दाखवेल असेही ना. शिंदे यांनी नमुद केले. 50 वर्षात जे घडलं नाही ते मोदींनी साडेनऊ वर्षात करून दाखविले. केंद्राचे राज्याला चांगले पाठबळ मिळत आहे. काहींनी अहंकारापोटी अडीज वर्षात महाराष्ट्राला मागे नेले, मात्र आंम्ही विचारपुर्वक निर्णय घेतला त्यामुळे महाराष्ट्राला काही कमी पडत नाही, देशात महाराष्ट्र पुन्हा अव्वल ठरला असल्याचे ना. शिंदं यांनी नमुद केले.

काहींनी गरीब हटावचा नारा दिला पण गरीबी हटली नाही. मात्र मोदींनी साडेनऊ वर्षात साडेतेरा कोटी जनतेला दारिद्रय रेषेच्या वर आणले व देशातील ८०कोटी जनतेला मोफत अन्नधान्य पुरविले व पुरवत आहेत.

शेतकऱ्यांना पिक विमा योजना, महिलांचे सक्षमिकरण केले. केवळ माझे कुटुंब व माजी जबाबदारी यापुरते मर्यादीत न रहाता सर्वसामान्यांसाठी काम केल्याचे त्यांनी सांगितले.

पर्यटन विकासाबरोबरच मच्छीमार बांधवांना आंम्ही न्याय दिला. कोकणच्या विकासासाठी कोकण विकास प्राधिकरणाची स्थापना करून त्यासाठि ५०० कोटीची तरतुद केली आहे, यापुढे कोकण मागास रहाणार नाही, तर राज्यात ते अव्वल असेल अशी ग्वाही ना. शिंदे यांनी दिली. कोकणवर ज्या ज्या वेळी संकट आले त्या त्या वेळी आंम्ही धावून आलो. महायुतीचे काम जनतेपर्यंत पोहचवा, महायुतीचे दुत व्हा आणि आगामी निवडणूकीत विरोधकांना चारी मुंडया चित करा असे आवाहन त्यांनी केले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे रत्नागिरी विमानतळावर आगमन झाले. यावेळी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. त्यानंतर राजापूर तालुक्यातील धोपेश्वर येथील हेलीपॅडवर मुख्यमंत्री ना. शिंदे यांचे आगमन झाले. विशेष पोलीस महानिरिक्षक प्रविण पवार, जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह, पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्ती किरण पुजार, सिंधुरत्न समृद्ध योजनेचे विशेष निमंत्रित किरण सामंत, माजी आमदार रविंद्र फाटक यांनी यावेळी पुष्पगुच्छ देवून मुख्यमंत्र्यांचे स्वागत केले.

जिल्हा पोलीस दलाकडून त्यांना यावेळी मानवंदना देण्यात आली. जवाहन चौकात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळयाला ना. शिंदे यांनी पुष्पहार अर्पण केला.

याप्रसंगी ना. शिंदे यांच्या उपस्थितीत राजापूरचे माजी नगराध्यक्ष हनिफ मुसा काझी, माजी उपनगराध्यक्ष रवींद्र बावधनकर, मन्सूर काझी यांसह शेकडो जणांनी शिवसेनेत प्रवेश केला. व्यासपीठावर ना. शिंदे यांचे राजापूर शिवसेनेच्या वतीने उपजिल्हाप्रमुख अशफाक हाजू, तालुका प्रमुख दीपक नागले., शहर प्रमुख सौरभ खडपे व सहकाऱ्यांनी स्वागत केले. तसेच किरण सामंत यांनीही मुख्यमंत्र्यांचे स्वागत केले. यावेळी किरण सामंत यांचा वाढदिवसानिमित्त ना. शिंदे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.