फरार कृष्णा आंधळे रत्नागिरीत? रत्नागिरीतील महिलेचा धक्कादायक दावा

रत्नागिरी:- मस्साजोग गावातील दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणात नवा पेच निर्माण झाला आहे. फरार आरोपी कृष्णा आंधळेबाबत आता धक्कादायक माहिती समोर आली आहे.

रत्नागिरीहून आलेल्या एका अनोळखी महिलेने देशमुखांच्या घरासमोर ठाण मांडून, कृष्णा आंधळे सध्या तिच्यासोबत असल्याचा तसेच तिच्याकडे त्याच्याविषयी महत्त्वाचे पुरावे असल्याचा दावा केला आहे.

शनिवारी सायंकाळी 6 वाजता ही अज्ञात महिला मस्साजोग येथील देशमुखांच्या घरासमोरील मंडपात येऊन थांबली. तिने पोलीसांना फरार असलेल्या कृष्णा आंधळेबाबत माहिती असल्याचं सांगून खळबळ उडवून दिली. तिच्या मते, कृष्णा आंधळे तिच्यासोबत राहतो आणि तिने काही पुरावेही गोळा केले आहेत. परंतु पोलिसांनी तिला नाव विचारले असताना, तिने कोणतीही ओळख सांगण्यास नकार दिला.

रात्रभर त्या पॅन्डॉलमध्ये राहिल्यानंतर, सकाळी तिने देशमुखांच्या घरातील बाथरूममध्ये अंघोळ करण्याचा हट्ट धरला. तिच्यासाठी इतर बाथरूमची सोय करून देण्यात आली, तरीदेखील ती देशमुखांच्या घरातच अंघोळ करणार, असा आग्रह धरत होती. त्यामुळे घरात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.

या घटनेनंतर केज पोलीस ठाण्यातून एक पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी चौकशी केली असता, महिला रत्नागिरी जिल्ह्यातील असल्याची माहिती मिळाली. नंतर ती महिला बसमध्ये बसून पुन्हा रत्नागिरीकडे रवाना झाली. या महिलेबाबत अधिक माहिती घेण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

दरम्यान, संतोष देशमुख हत्याप्रकरणातील कृष्णा आंधळे हा आरोपी गेल्या महिन्यात नाशिकमध्ये दिसल्याचा दावा एका व्यक्तीने केला होता. आता रत्नागिरीहून आलेल्या या महिलेच्या दाव्यानंतर तपास अधिक व्यापक पातळीवर सुरू झाला आहे. पोलिस महिलेने केलेल्या दाव्यानंतर अधिकची चौकशी करत आहेत.

महिलेबाबत काय म्हणाले धनंजय देशमुख

मला कुटुंबीयांकडून सांगण्यात आलं की, एक महिला घरी आलेली आहे, तिच्याकडून कृष्णा आंधळेबाबत काही पुरावे असल्याचं सांगण्यात आलं. त्यामुळे, आम्ही याबाबत गावकरी व पोलिसांना कळवलं होतं. तसेच, रत्नागिरी पोलिसांनाही आम्ही याबाबत माहिती दिली. तेव्हा रत्नागिरी पोलिसांनी देखील या महिलेनं इथं तशाप्रकारच्या तक्रारी दिल्या आहेत. पण, आम्ही त्याची शहानिशा करत असल्याचं म्हटलं आहे. सबंधित महिला आता निघून गेल्या आहेत. या महिलेनं सकाळी अंघोळ करायचं म्हटल्यानंतर त्यांची इतरत्र सोय करण्यात आली. पण, त्यांनी आमच्या घरीच अंघोळ करायचा आग्रह केल्याने संशय निर्माण झाला. दरम्यान, रात्रभर त्या इथंच थांबलेल्या होत्या, त्यांच्या सोबतील महिला पोलीस कॉन्स्टेबलही होत्या, अशी माहिती धनंजय देशमुख यांनी दिली.