रत्नागिरी:- फणसोप ग्रा.पं.मध्ये जो काही विकास झाला आहे तो उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या माध्यमातून झालेला आहे. येथील ग्रामस्थांचे छोटेमोठे प्रश्न ना. सामंत यांनी सोडवले आहेत. ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीत बाळासाहेबांची शिवसेना पक्षाकडून थेट सरपंचपदाच्या उमेदवार सौ. अमृता शेलार रिंगणात असून, बिनविरोध झालेल्या चार जागा कोणाच्या आहेत हे 17 ऑक्टोबर स्पष्ट होईल असे युवा तालुकाप्रमुख तुषार साळवी यांनी सांगितले.
फणसोपमध्ये शिवसेनेमध्ये दोन गट कार्यरत असून, ठाकरे गटाच्या सरपंच पदाच्या उमेदवार सौ. राधिका साळवी यांना पक्षांतर्गतच विरोध आहे. माजी सरपंच असलेल्या सौ. साळवी यांच्यावर निष्क्रियतेचा शिक्का बसलेला होता. स्वत: ऐवजी पती राकेश साळवी यांच्या मताप्रमाणे त्या निर्णय घेत होत्या, असा त्यांच्यावर ग्रामस्थांचा आक्षेप होता. जर राधिका साळवी यांनी विकास कामे केली असतील तर त्यानंतरच्या निवडणुकीत राकेश साळवी यांना पराभव का स्वीकारावा लागला आणि नंदा मुरकर यांना सदस्यांनी का विजयी केले, याचाही अभ्यास होणे आवश्यक आहे.
कोळंबे-बौध्दवाडी येथील नळपाणी योजनेचे श्रेय घेण्याचा प्रयत्न विरोधक करीत आहेत. परंतु ही योजना ना. सामंत यांच्यामुळे नंदा मुरकर यांच्या कार्यकाळात मार्गी लागली. याचे श्रेय राधिका साळवी यांनी घेऊ नये. कोरोना काळामध्ये फणसोप जुईवाडी येथील बससेवा बंद झाली होती. ही बससेवा ना. उदय सामंत यांच्या मध्यस्थीने सुरु झाली. परंतु काही ग्रामस्थांनी जिल्हाधिकार्यांना पत्र व्यवहार करुन ही बससेवा बंद करण्याचे काम केल्याचा आरोपही तुषार साळवी यांनी केला.
फणसोप गावचा जो काही विकास झाला आहे तो मंत्री सामंत यांच्या माध्यमातून झाला आहे. नंदा मुरकर व बाबा साळवी यांनी हा विकास केला आहे. विशेषत: संपूर्ण गावातील स्ट्रीट लाईट, पक्के रस्ते, गटारे, नळपाणी योजना, पाखाड्या, शाळा दुरुस्ती आणि फणसोप ग्रा.पं.ची भव्य वास्तू बांधून गैरसोय दूर करण्यात आली आहे. या इमारतीच्या शुभारंभाकडेही राधिका साळवी यांनी पाठ फिरवली होती. यावरुन गावच्या विकास कामांबाबत किती सामाजिक बांधिलकी आहे हे स्पष्ट होत असल्याचे तुषार साळवी यांनी सांगितले.
ग्रा.पं. निवडणुकीत 11 सदस्यांपैकी 6 जागा बिनविरोध झाल्या आहेत. त्यातील नवा फणसोप येथील दोन जागा जमातीमार्फत बिनविरोध झाल्या आहेत. तर चार जागा या मागलाड येथून बिनविरोध झाल्या आहेत. बिनविरोध झालेले सदस्य नेमके कोणाकडे आहेत हे 17 ऑक्टोबरला स्पष्ट होईल असेही तुषार साळवी यांनी सांगितले.
बाळासाहेबांची शिवसेनेच्या उमेदवार सौ. अमृता शेलार यांना कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसून सर्वसामान्य घरातील महिला असून, त्यांना जनतेचा उर्त्स्फुत पाठिंबा मिळत असल्याचेही तुषार साळवी यांनी सांगितले.
सरपंच व निवडणूक होत असलेल्या सदस्य उमेदवारांच्या पाठिमागे बाबा साळवी, लक्ष्मीकेशव देवस्थानचे अध्यक्ष राहूल साळवी, मानकरी संतोष साळवी, सचिन गुरव, समिर साळवी, साबीरा होडेकर, नवीन साळवी, सुशील साळवी, मनोज साळवी, प्रवीण साळवी, हसनमियाँ होडेकर, निजामभाई होडेकर, विलास कांबळे, दिवेन कांबळे, नितीन नलावडे सालिक सारंग यांची खंबीर टीम मागे उभी असून, ना. सामंत यांचे स्वीय सहाय्यक नेताजी पाटील यांनी निवडणुकीवर लक्ष ठेवले असल्याचे तुषार साळवी यांनी सांगितले.