यूपी, बिहारची नावे यादीत; साडेसातशे बोगस नावे
रत्नागिरी:- विद्यार्थ्यांना प्री मॅट्रीक शिष्यवृत्तीच्या ऑनलाईन अर्जात बोगस नावांची नोंद केल्याचा प्रकार पुढे आला आहे. जिल्ह्यातील सुमारे 200 शाळांमधून साडेतेराशे नावे बोगस आहेत.
अल्पसंख्यांक शिष्यवृत्तीसाठी पन्नास टक्केपेक्षा अधिक गुण आणि 1 लाखापेक्षा कमी उत्पन्न असलेल्या पहीली ते दहावीपर्यंतच्या मुलांना केंद्र शासनाकडून आर्थिक लाभ दिला जातो. ऑनलाईन अर्जासाठी शाळास्तरावर लॉगीन आयडी आणि पासवर्ड दिला जातो. शाळांनी प्रक्रिया पूर्ण केल्यावर जिल्हा व राज्यस्तरावर त्याची तपासणी होते आणि ती यादी केंद्राकडे पाठवतात. यामध्ये विद्यार्थ्यांचे अर्ज लॉगीन करुन कागदपत्रे शाळांकडेच ठेवली जातात. केंद्र शासनाने प्रत्येक राज्याला उद्दीष्ठ निश्चित केले असून महाराष्ट्रासाठी 2 लाख 85 हजाराचे उद्दीष्ट दिलेले होते. प्रत्यक्षात साडेनऊ लाख अर्ज प्राप्त झाल्यामुळे केंद्र शासनाने महाराष्ट्रासह सर्वच राज्यांची नोंदणीकृत विद्यार्थ्यांची पडताळणी करण्याचे आदेश दिले. त्यानुसार अल्पसंख्याक व प्रौढ शिक्षण विभागाकडून जिल्हानिहाय पडताळणी सुरु आहे. रत्नागिरी जिल्ह्याचा आढावा अल्पसंख्यांक शिक्षण उपसंचालक यांनी घेतला.
दहावीपुर्वीच्या शिष्यवृत्तीसाठी जिल्ह्यात 3 हजार 171 शाळांमधून 9 हजार 400 फेर अर्ज भरण्यात आले आहेत. त्यातील नव्याने भरलेल्या अर्जांची संख्या 7 हजार 203 आहे. 200 शाळांतील सुमारे साडेतेराशे नावे बोगस आहेत. ती नावे डीफेक्ट करण्याचे आदेश उपसंचालकांनी दिले आहेत. या पडताळणीत मागील पाच वर्षांची कागदपत्रेही तपासण्याच्या सुचना दिल्याने सर्वच शाळांची तारांबळ उडाली आहे. शाळांचा लॉगीन आयडी लिक करुन हा प्रकार केल्याचा अंदाज आहे. रत्नागिरीतील बहूतांश बनावट नावांची नोंद पश्चिम बंगालमधून झाली आहेत असा अंदाज आहे. संबंधित अर्जातील दुरध्वनी क्रमांकांवर संपर्क केल्यास ते बंद होते. यावरुन ती नावे फेक असल्याचे स्पष्ट झाले आहेत. ती सर्व नावे शाळा लॉगिनवरुन डिफेक्ट करण्याच्या सुचना दिल्या आहेत. शासनाने कागदपत्रे पडताळणी आणि नवीन नोंदणीसाठी शाळा लॉगीनला 12 फेब्रुवारीपर्यंत मुदत वाढ दिली आहे. जिल्हास्तरावरील अर्ज पडताळणी 20 पर्यंत करावयाची आहे. वाढीव मुदतीचा फायदा घेऊन प्रलंबित सर्व अर्ज विद्यार्थ्यांचे कागदपत्रे तपासून पडताळणी पूर्ण करण्याच्या सुचना दिल्या आहेत.