रत्नागिरी:- शहरातील प्रादेशिक मनोरुग्णालयात फिट येउन बेशूध्द पडलेल्या तरुणाला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले होते. उपचारांदरम्यान त्यांचा मृत्यू झाला. विनायक विलास कुंभार (३०, रा. वहाळ चिपळूण) असे उपचारांदरम्यान मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. ही घटना गुरुवारी (ता. २०) रात्री साडेनऊच्या सुमारास जिल्हा रुग्णालयात घडली.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, २९ ऑक्टोबर २०२५ला विनायक कुंभार हा प्रादेशिक मनोरुग्णालय रत्नागिरी येथे दाखल झाला होता. त्याच्यावर उपचार सुरु असताना २० नोव्हेंबरला रात्री नऊच्या सुमारास विनायक बेडवर झोपलेला असताना त्याला अचानकपणे फिट आली व तो बेशूध्द पडला. ही बाब त्यावेळी रात्रपाळीसाठी ड्यूटीवर असलेल्या स्टाफ नर्स प्रेरणा पवार यांच्या लक्षात येताच त्यांनी याबाबत डॉ. कलकुरभी यांना माहिती दिल्यावर त्यांनी विनायकवर प्राथमिक औषधोपचार करुन त्याला अधिक उपचारांसाठी जिल्हा शासकिय रुग्णालयात दाखल केले. तेथील वैद्यकिय अधिकाऱ्यांनी विनायकला तपासून मृत घोषित केले. याबाबत शहर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.









