प्रादेशिक नळपाणी योजनांचे 15 टक्के काम पूर्ण

तालुक्यातील 37 गावांची तहान भागवणारी योजना वर्षभरात जाणार पुर्णत्वास

रत्नागिरी:- तालुक्यातील 37 गावांची तहान भागवणार्‍या मिर्‍या, शिरगाव, निवळी तिठा यांसह अन्य 34 गावांच्या प्रादेशिक नळपाणी पुरवठा योजनेचे 15 टक्के काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे येत्या वर्षभरात या योजनेचे पूर्ण काम होऊन ग्रामस्थांना घरात नळाद्वारे पाणी मिळणार आहे. याचा थेट लाभ 76205 ग्रामस्थांना होणार असून एमआयडीसीचा पाणीपुरवठ्याचा भार कमी होणार आहे. तब्बल 135.72 कोटी रुपये या योजनेसाठी खर्च करण्यात येणार असून महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या नियंत्रणाखाली योजनेचे काम सुरू आहे.

रत्नागिरी शहरानजिकच्या गावांना पाणी पुरवठा करण्यासाठी विद्यमान उद्योगमंत्री ना.उदय सामंत यांच्या संकल्पनेतून मिर्‍या, शिरगाव, निवळी तिठा या प्रादेशिक नळपाणी योजनेसाठी बावनदीवर वळके मराठवाडी येथे कोल्हापुर टाईप बंधारा उभारण्याचे काम सुरू आहे तर दुसरा बंधारा साठरे बांबर येथे उभारण्यात येणार आहे. 127 मीटर लांबीचा व चार मीटर उंचीचा हा बंधारा असून येथील विहिरीतून पाणी उचलले जाणार आहे. त्यानंतर उंच व बैठ्या 34 पाणी साठवण टाक्या व 7 सिंटेक्स टाक्या बसविण्यात येणार आहेत. या योजनेसाठी वेळवंड येथेच जलशुद्धीकरण केंद्र उभारण्यात येणार असून तेथे 15 एमएलटी पाणी साठविण्यात येणार आहे. तर निवळी गावडेवाडी येथे मोठी टाकी बांधण्यात येत असून तिची क्षमता 24.70 दशलक्ष घनमीटर आहे. तेथून करबुडे, निवळी हातखंबा, पानवल, खेडशी येथील टाक्यांमध्ये पाणी सोडण्यात येणार आहे. या टाक्यातून नाचणे, कर्ला, शिरगाव, भाटीमिर्‍या, जाकीमिर्‍या या गावांना पाणी सोडण्यासाठी कुवारबाव येथील सामाजिक न्याय भवनाजवळ उंच टाकी उभारण्यात येणार आहे.

सुधारित मिर्‍या, शिरगाव, निवळी तिठा व अन्य 34 गावे प्रादेशिक नळपाणी पुरवठा योजनेंतर्गत जाकीमिर्‍या, मिर्‍या, सडामिर्‍या, आडी, मुसलमानवाडी, शिरगाव, तिवंडेवाडी, झाडगाव, निवळी, रावणंगवाडी, धनावडेवाडी, कांजरेकोंड, कपिलनगर, करबुडेकोंड, करबुडे, कुंभारवाडा, मुळगाव, वेद्रेवाडी, डांगेवाडी, हातखंबा, तारवेवाडी, घवाळवाडी, पानवल, खेडशी, पोमेंडी, कारवांचीवाडी, कुवारबाव, मधलीवाडी, मिरजोळे, पाडावेवाडी, शीळ, ठिकाणदाते, आंबेशेत, नाचणे, जुवे, कर्ला, मुस्लीमवाडी या गावांचा समावेश आहे.

या प्रादेशक नळ पाणीपुरवठा योजनेचे काम 50 टक्के शिल्लक आहे. वर्षभरात योजनेचे काम पूर्ण करण्याची तयारी जय दीपराज इन्फ्रास्ट्रक्चर मुंबई यांनी केली आहे.