प्राथमिक शिक्षक संघाला मुख्यमंत्री यांची ग्वाही
रत्नागिरी:- महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघातर्फे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेवून विविध प्रलंबीत प्रश्नांवर चर्चा करण्यात आली आहे. हे सर्व प्रश्न सोडवण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे, अशी माहिती राज्य संपर्कप्रमुख विकास नलावडे यांनी दिली.
संघाचे प्रमुख संभाजीराव थोरात तात्या यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या समवेत विशेष बैठक वर्षा निवासस्थानी पार पडली. यावेळी मुख्यमंत्री यांच्या हस्ते महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाची अधिकृत वेबसाईट, युट्युब चॅनेल, फेसबुक पेज, ट्विटर, इंस्टाग्राम सर्वच सोशल मीडिया अकाउंट चे उद्घाटन करण्यात आले.
राज्याध्यक्ष अंबादास वाजे, राष्ट्रीय महासचिव बाळासाहेब झावरे, मधुकर काठोळे, राज्य सरचिटणीस आबासाहेब जगताप, राज्य संपर्कप्रमुख विकास नलावडे, रत्नागिरी जिल्हाध्यक्ष संतोष कदम यांच्यासह सर्व जिल्ह्यातील जिल्हाध्यक्ष व पदाधिकारी उपस्थित होते. मुख्यालय राहण्याची अट रद्द करण्यात यावी. वैद्यकीय उपचारासाठी कॅशलेस सुविधा उपलब्ध करून द्यावी. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कर्मचार्यांप्रमाणे शिक्षकांना 10,20,30 वर्षाची आश्वासित प्रगती योजना लागू करावी. मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा आणि सरळ सेवेकरिता पात्र होण्यासाठी जिल्हा परिषदा, जिल्हा सेवा प्रवेश नियम 1967 च्या सेवा प्रवेश नियमात सुधारणा करण्यात यावी. केंद्रप्रमुख पदे लवकरात लवकर शंभर टक्के शैक्षणिक व व्यावसायिक अर्हतेच्या आधीन राहून प्राथमिक शिक्षकांमधून भरण्यात यावी. विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षांसाठी व्यावसायिक व शैक्षणिक अर्हता पूर्ण करणार्या सर्व शिक्षकांना परीक्षेसाठी संधी देण्यात यावी व त्यासाठी वयोमर्यादा 50 करण्यात यावी. एक नोव्हेंबर 2005 नंतर सेवेत दाखल झालेल्या शिक्षकांना अंशदायी पेन्शन योजना रद्द करून जुनी पेन्शन योजना लागू करण्यात यावी आदी विविध मागण्यांवर चर्चा झाली. हे सर्व प्रश्न सोडवण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.









