जिल्हा परिषद फायर इस्टींग्वीशर, फायर बॉल बसवणार
रत्नागिरी:- जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि उपकेंद्रे आता आगीपासून सुरक्षित होणार आहेत. जिल्हा परिषदेने प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्र, नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र आणि प्राथमिक आरोग्य उपकेंद्र या ठिकाणी फायर इस्टींग्वीशर आणि फायर बॉल बसवण्याचा निर्णय घेतला आहे. त्याची खरेदी झाली असून त्याचे वितरण करण्यात आले आहे.
जिल्ह्यातील प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि उपकेंद्रे यांचे फायर ऑडीट करा आणि त्या त्या ठिकाणी अग्निशामक बसवण्यात यावेत अशा सुचना शासन स्तरावरुन आल्या होत्या. त्यानुसार जिल्हा परिषदेने जिल्हा नियोजन समितीकडे अंदाजपत्रक तयार करुन पाठवले होते. त्यानुसार जिल्हा नियोजन समितीकडून सुमारे ३८ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला होता. याच निधिमधून प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्र आणि उपकेंद्र यांचे फायर ऑडीट करण्यात आले. तसेच फायर इस्टींग्वीशर आणि फायर बॉल देखील बसवण्यात आले आहेत. जिल्ह्यात २६८ प्राथमिक आरोग्य केंद्र, ३७८ उपकेंद्र आणि ६ नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र या ठिकाणी फायर इस्टींग्वीशर आणि फायर बॉल बसवण्यात आले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्र आणि उपकेंद्र आगीपासून सुरक्षित झाली आहेत. त्याचप्रमाणे आता पुन्हा जिल्हा परिषदेने जिल्हा नियोजन समितीकडे या सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या स्ट्रक्चरल ऑडीट करिता निधी मंजूर व्हावा यासाठी प्रस्ताव पाठवला आहे. त्यामुळे या प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यावर प्राथमिक आरोग्य केंद्रांचे स्ट्रक्चरल ऑडीट देखील होणार असल्याची माहीती जिल्हा परिषद जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये यांनी दिली.